Vaibhav Gaikwad's Blog

Sunday, October 2, 2011

स्वप्नातले गांधी


काल रात्री स्वप्नात मी कायच्या-काय भरकटलो होतो
चक्क बापू आले होते समोर, गप्पा मारत बसलो होतो
मी म्हंटलं, काय पप्पा, अचानक कसं काय केलंत येणं?
बापू हडबडले, म्हणाले 'पप्पा'शी माझं काय देणं-घेणं

मला वाटलं भारतातले लोक मला अजूनही बापू म्हणतात
म्हंटलं, तसं बोलणाऱ्यांना लोक आता गावंढळ म्हणून गणतात
उगाच तुम्ही बापू इंग्रजांना हाकलण्यासाठी लढलात
इंग्रजाळलेल्या जनतेसाठी उभा जन्म कष्टात काढलात

बापूंना काही उमजेना, डोक्यावर हात मारत म्हणाले, हे राम
म्हंटलं, तो तर राजकारणात कामाचा हो, इथे त्याचं काय काम?
असं कसं बोलतोस बाळा, अरे हीच का तुमची आस्था?
अरे, रामराज्याच्या स्वप्नासाठीच तर केली ना इतकी पराकाष्ठा?

बापू, ते रामराज्याचं प्रकरण तर आमच्यासाठी केव्हाच मिटलंय
जबाबदारी मोठी, म्हणून ते आम्ही दोन पक्षात वाटलंय
राम दिलाय भाजपला, ते त्याच्या नावाने गळे कापतात
राज्य दिलंय कॉंग्रेसला, ते बसून नुसते पैसे छापतात

'ते' बसून पैसे छापतात, तर बाकी १०० कोटी काय करतात?
त्यांच्या पैशांच्या बातम्या ऐकतात, आणि उपाशी पोटी मरतात.
भारत आता काही गरीब नाही बापू, पैसा वाढलाय मस्त
लाखो कोटींचे तर घोटाळेच होतात, कुठल्याही देशापेक्षा जास्त

तुम्ही म्हणालात गावाकडे जा, गाव नावाला उरलंय मात्र
दिवसाकाठी शेतकरी मरतात, लक्ष देत नाही तिकडे कुत्रं
शेतकी सोडून इकडे साऱ्यांनी क्रिकेटचा बाजार मांडलाय
बावीस यार्डाच्या खेळपट्टीवर अख्ख्खा कुबेराचा खजिना सांडलाय

शंभर धावा करणाऱ्याला, जाहीर सभेत भूखंड मिळतो
आणि शंभर क्विंटल पिकवणारा, शेवटी टिक-२० गिळतो
गरिबांच्या पॅकेजपेक्षा मोठं असतं यांच्या जाहिरातींचं उत्पन्न
आणि ढोंगी बाबांच्या कृपेवर जगणारेच होतात आता संपन्न

तुमचा सत्याग्रहाचा मंत्र मात्र आजही प्रचंड यशस्वी ठरतो
व्यवस्था बदलायला निघालेला, अख्ख्या व्यवस्थेला वेठीस धरतो
सत्याग्रहांची सुद्धा बापू आजकाल फॅशन झाली आहे
एका वाल्मिकीच्या मागे, आता ढीगभराने वाली आहेत.

तुमच्या जयंतीला सरकार सुट्टी देऊन पेंगा काढत बसते
तुम्हाला श्रद्धांजली द्यायला शेवटी बेवड्यांचीच मैफिल असते
तुमच्यामुळे dry day ला दारू प्यायला सरकार नाही म्हणते
आणि गरिबाला खायला धान्य नाही, कारण त्याची सरकारी दारू बनते

तुमचं म्हणे बापू, नेताजींशी पटायचं नाही, वैचारिक मतभेदांचा असर
आम्ही त्याचा बदला एकदम जबरी घेतलाय, अगदी बिना कसर
राजकारण्यांना आता आम्ही नेताजी म्हणून हाक मारतो
कचकन शिवी घातल्यासारखी, सुभाषबाबूंची लाज काढतो

बापू, तुमचा वस्त्र-त्याग सुद्धा आम्ही अजूनही विसरत नाही,
चार विती कपडा आजकाल पोरींच्या अंगभर पसरत नाही
पावलोपावली तुमच्या तत्वांचे अगदी हिडीस दर्शन घडतात
अहो, सत्याग्रहाला पाठींबा म्हणून पोरी नागडे फोटो काढतात

फक्त आमचीच नाही बापू, तर तुमची पण पत वाढलीय
तुमच्यासारख्या फाटक्या फकिराची आम्ही हजारची नोट काढलीय
त्यारूपे तुम्ही थेट भ्रष्टाचाऱ्यांच्या तिजोरीत आराम झोडता
थेट निवडणुकीला बाहेर येऊन, एकमेकांची वोट-बँक फोडता

धडपडत उठले, तडक निघाले, मी विचारलं, बापू काय झालं?
गलबलून बोलले ते एकदम, आता बाकी तरी काय राहिलं?
माझ्या नश्वर शरीराला गोडसेने संपवल्याच्या बाता करता?
अरे त्याने एकदा मारलं, तुम्ही मला रोजरोजच मारता!!

- वैभव गायकवाड
(शुद्धीत असलेला गांधीवादी)


Bookmark and Share

12 comments:

वैभव गायकवाड said...

जबर झालीय. बऱ्याच दिवसांपूर्वी वाचायला दिली होतीस. तेव्हाच तुला बोललेलो की ही कविता गाजेल. एखाद्या तरुणाने गांधींवर केलेली ही सर्वोत्तम कविता आहे. मार्क माय वर्डस! - नेहमीच शुद्धीत आणि जमिनीवर असलेला आंबेडकरवादी! :) 

वैभव गायकवाड said...

Wow, The most meaningful poem I've read in quite a while. Hats off...

वैभव गायकवाड said...

Bhartacha ithas punnah tu wachun dakhavlya baddal gnadhiji nakkich tuje aabhar mantil ani punnha ajun asach 1 gandhi punnha janma ghein.......

वैभव गायकवाड said...

 heyy tats jst gr8...

वैभव गायकवाड said...

देशाला गांधींच्या विचारांची गरज आहे, त्यासाठी पुन्हा गांधी जन्माला यायची
वाट पाहत बसण्यापेक्षा त्यांचे विचार नीट समजून-उमजून आचरणात आणायची गरज
आहे.

वैभव गायकवाड said...

उत्तम , अतिउत्तम .......मला अगदी मनापासून आवडली..........

खंर पाहता मी अगदी anti गांधीवादी आहे , ज्या माणसामुळे आज

हि भारताची आपल्या हिंदू स्थानाची दशा झाली आहे , त्या

गांधी ह्या नावाची  अगदी शिषारी बसली आहे, पण खरंच जे काही गमती जमती ने तू

वर्णन केलं आहेस ते वाखाणण्याजोग  आहे ,

मला खरच आवडली  कविता........

असंच  कविता असेच लेख लिहित जा आम्ही तुझ्या बरोबर  आहोत....

माझा बालपणीचा मित्र  म्हणण्यात मला अगदी  अभिमान वाटतो, आणि हे खंर आहे....

best luck .

वैभव गायकवाड said...

जबरदस्त झाले कविता.............पप्पा

वैभव गायकवाड said...

१. कुणी anti गांधीवादी नसते. गांधीवाद माणुसकी शिकवतो - त्याचा विरोध कसा करणार?

२. आज देशाची जी परिस्थिती आहे, त्याला गांधीजी कसे बरे कारणीभूत असतील?
शाळेत असताना शिकलेला 'महापुरुषांचा पराभव' नावाचा धडा आठवतोय ना?

३. आणि हा भारत आहे, हिंदुस्थान नव्हे...ना तो आपला अधिकृत धर्म आहे, ना तो
धर्म या भूमीवर जन्माला आलाय. मुळात हिंदू हा धर्माच्या category मध्ये
बसतच नाही. ती एक जीवन पद्धती आहे जी आधी वैदिक जीवनपद्धती म्हणून ओळखली
जायची. त्याला हिंदू अशी धर्म म्हणून ओळख काल-परवाची.



धन्यवाद, तुला माझी कविता आवडल्याबद्दल. गांधीवाद ठामपणे मांडणारी कविता
तुला आवडते, पण गांधीवाद तुला पटत नाही - गणित काही कळलं नाही.

पण, धन्यवाद.

वैभव गायकवाड said...

really very good..

वैभव गायकवाड said...

गांधीजी बद्दल तुमची तरुण पिढी विचार करते हे वाचून बरे वाटले नाहीतर भारत नुसत्या युद्धाने कधीच स्वतंत्र झाला नसताब्रिटीशांनी आणखी शंभर वर्षे सहज राज्य केले असते कारण गोडसे तेव्हांही होते आताही आहेत परंतु गांधीजीसारखा नेता एकदाच जन्मतोअभिनंदन तुजे असाच छान लिहित जा..अनेक आशीर्वाद 

वैभव गायकवाड said...

One of the best poems on Gandhiji! People would be surprised if they find out your age! But then, I also feel that by saying this I am de-linking Gandhi and the younger generation which is also not the case! :) 'Apt' is the only word! :)

वैभव गायकवाड said...

खूप मस्तं ! पुन्हा एकदा वाचून काढलं !

Post a Comment

Related Posts with Thumbnails