हल्ली मी रोज फेसबुकवर पाहतो - माझे बरेच मित्र कुठल्या ना कुठल्या देखण्या मुलींना friend म्हणून add करत असल्याचे. रोज रोज यांना या मुली कुठून मिळत(हो, मिळत) असतील, की हे मित्रलोक फेसबुकवर फक्त या माल पोरी शोधायलाच येतात? बरेच दिवस इकडचे-तिकडचे असे notifications बघून विचार केला की का नाही आपण यांना सावध करण्यासाठी एखादा लेख लिहावा.
पूर्वी ऑर्कुटवर आणि आता फेसबुकवर मुलींच्या नावाने उघडलेले फेक अकाउंट्स सर्वत्र दिसतात. या मुलींची नावे पण अशी की कुणाला शंका येणार नाही अकाउंट नकली असल्याचे. अदिती मल्होत्रा, नेहा महोपात्रा, कीर्ती गांगुर्डेकर, किरण यादव, सोनाली कदम अशी नावे पाहिली की लगेच आपण क्लिक करून बघतोच कोण आहे ते. सोबत एखाद्या उफाड्याच्या मुलीचा (बहुधा देसीच) फोटो लावलेला असतो. कधी एकच फोटो असतो तर कधी अख्खा अल्बम देखील. हे फोटो असेच कुणाच्या तरी अकाउंट वरून ढापलेले असतात. त्या बिचाऱ्या मुलींना तर याची कधी कल्पनाही नसावी.

काल रात्री स्वप्नात मी कायच्या-काय भरकटलो होतो
चक्क बापू आले होते समोर, गप्पा मारत बसलो होतो
मी म्हंटलं, काय पप्पा, अचानक कसं काय केलंत येणं?
बापू हडबडले, म्हणाले 'पप्पा'शी माझं काय देणं-घेणं
मला वाटलं भारतातले लोक मला अजूनही बापू म्हणतात
म्हंटलं, तसं बोलणाऱ्यांना लोक आता गावंढळ म्हणून गणतात
उगाच तुम्ही बापू इंग्रजांना हाकलण्यासाठी लढलात
इंग्रजाळलेल्या जनतेसाठी उभा जन्म कष्टात काढलात
बापूंना काही उमजेना, डोक्यावर हात मारत म्हणाले, हे राम
म्हंटलं, तो तर राजकारणात कामाचा हो, इथे त्याचं काय काम?
असं कसं बोलतोस बाळा, अरे हीच का तुमची आस्था?
अरे, रामराज्याच्या स्वप्नासाठीच तर केली ना इतकी पराकाष्ठा?
बापू, ते रामराज्याचं प्रकरण तर आमच्यासाठी केव्हाच मिटलंय
जबाबदारी मोठी, म्हणून ते आम्ही दोन पक्षात वाटलंय
राम दिलाय भाजपला, ते त्याच्या नावाने गळे कापतात
राज्य दिलंय कॉंग्रेसला, ते बसून नुसते पैसे छापतात
'ते' बसून पैसे छापतात, तर बाकी १०० कोटी काय करतात?
त्यांच्या पैशांच्या बातम्या ऐकतात, आणि उपाशी पोटी मरतात.
भारत आता काही गरीब नाही बापू, पैसा वाढलाय मस्त
लाखो कोटींचे तर घोटाळेच होतात, कुठल्याही देशापेक्षा जास्त
तुम्ही म्हणालात गावाकडे जा, गाव नावाला उरलंय मात्र
दिवसाकाठी शेतकरी मरतात, लक्ष देत नाही तिकडे कुत्रं
शेतकी सोडून इकडे साऱ्यांनी क्रिकेटचा बाजार मांडलाय
बावीस यार्डाच्या खेळपट्टीवर अख्ख्खा कुबेराचा खजिना सांडलाय
शंभर धावा करणाऱ्याला, जाहीर सभेत भूखंड मिळतो
आणि शंभर क्विंटल पिकवणारा, शेवटी टिक-२० गिळतो
गरिबांच्या पॅकेजपेक्षा मोठं असतं यांच्या जाहिरातींचं उत्पन्न
आणि ढोंगी बाबांच्या कृपेवर जगणारेच होतात आता संपन्न
तुमचा सत्याग्रहाचा मंत्र मात्र आजही प्रचंड यशस्वी ठरतो
व्यवस्था बदलायला निघालेला, अख्ख्या व्यवस्थेला वेठीस धरतो
सत्याग्रहांची सुद्धा बापू आजकाल फॅशन झाली आहे
एका वाल्मिकीच्या मागे, आता ढीगभराने वाली आहेत.
तुमच्या जयंतीला सरकार सुट्टी देऊन पेंगा काढत बसते
तुम्हाला श्रद्धांजली द्यायला शेवटी बेवड्यांचीच मैफिल असते
तुमच्यामुळे dry day ला दारू प्यायला सरकार नाही म्हणते
आणि गरिबाला खायला धान्य नाही, कारण त्याची सरकारी दारू बनते
तुमचं म्हणे बापू, नेताजींशी पटायचं नाही, वैचारिक मतभेदांचा असर
आम्ही त्याचा बदला एकदम जबरी घेतलाय, अगदी बिना कसर
राजकारण्यांना आता आम्ही नेताजी म्हणून हाक मारतो
कचकन शिवी घातल्यासारखी, सुभाषबाबूंची लाज काढतो
बापू, तुमचा वस्त्र-त्याग सुद्धा आम्ही अजूनही विसरत नाही,
चार विती कपडा आजकाल पोरींच्या अंगभर पसरत नाही
पावलोपावली तुमच्या तत्वांचे अगदी हिडीस दर्शन घडतात
अहो, सत्याग्रहाला पाठींबा म्हणून पोरी नागडे फोटो काढतात
फक्त आमचीच नाही बापू, तर तुमची पण पत वाढलीय
तुमच्यासारख्या फाटक्या फकिराची आम्ही हजारची नोट काढलीय
त्यारूपे तुम्ही थेट भ्रष्टाचाऱ्यांच्या तिजोरीत आराम झोडता
थेट निवडणुकीला बाहेर येऊन, एकमेकांची वोट-बँक फोडता
धडपडत उठले, तडक निघाले, मी विचारलं, बापू काय झालं?
गलबलून बोलले ते एकदम, आता बाकी तरी काय राहिलं?
माझ्या नश्वर शरीराला गोडसेने संपवल्याच्या बाता करता?
अरे त्याने एकदा मारलं, तुम्ही मला रोजरोजच मारता!!
- वैभव गायकवाड
(शुद्धीत असलेला गांधीवादी)
दर एक तारखेला जुना महिना संपतो, आणि दर एक तारखेला हा नवीन पोस्ट येतो. कधी-कधी सांगण्यासाठी खूप काही असतं, तर कधी काहीच नसतं. या महिन्यात सांगायला खूप काही आहे, पण वेळेचं बंधन असल्याने जरा आवरतं घ्यायला लागणार आहे. हा एकूणच महिना असाच गेलेला आहे.
या महिन्यात प्रकाशित होणाऱ्या लेखांची यादी अपेक्षेपेक्षा फारच रोडावलेली आहे. लता मंगेशकर, हृषीकेश मुखर्जी आणि आज प्रकाशित करायचा योजलेला मजरूह सुलतानपुरी यांच्यावरचे लेख कधी पूर्णच नाही होऊ शकले. देव आनंदवरचा लेख मी जुलैमध्ये प्लान केला होता, नशीब इतकेच की निदान तो तरी लेख आयत्या वेळी लिहून पूर्ण झाला आणि प्रकाशित होऊ शकला. अर्थात, देवाचं कार्य ते. तो त्याला अर्धवट कसा राहू देईल. तरी बऱ्याच गोष्टी लिहायच्या राहिल्या. खास करून देव आनंदच्या गाण्यांबद्दल. पण हरकत नाही, कधीतरी देव आनंदच्या गाण्यांसाठी एक खास लेख लिहू, नक्कीच worth आहे.