Vaibhav Gaikwad's Blog

Saturday, April 30, 2011

Top 10 Pages of April '11



बघता बघता महिना संपला. आता कुठे एप्रिल चालू झाला होता. विश्वचषक जिंकला, अण्णा-प्रकरण उरकले, IPL चालू झाल्या आणि सेम संपत आली. सगळ्या घटना इतक्या दणादण घडल्या की महिना कुठे उलटला कळलंच नाही. या सेमच्या बाकी महिन्यांप्रमाणे हा देखील प्रचंड धावपळीचा महिना. हा लेख प्रकाशित झाल्यानंतर जेमतेम दोन आठवडे कॉलेज - त्यातच परीक्षा आणि एकदा सगळ्यातून सुटलो की मग थेट मुंबई. पुढचा Top 10 of The Month मुंबईत बसून लिहिणार. उफ्फ, निदान तितकाच दिलासा. सतरा महिन्यांनंतर पुन्हा मुंबईला येतोय. त्यानंतर परत कधी योग येईल लवकर माहित नाही. त्यामुळे ही संधी चांगलीच वसूल करून घ्यायचा मनसुबा आहे. दोन महिन्यांपूर्वी मी एका बातमीबद्दल सुतोवाच केले होते, तो विषय अजूनही टांगणीलाच आहे. त्यामुळे याही महिन्यात अधिकृत अशी घोषणा नाही. पण पुढच्या आपल्या मासिक अहवालात त्याचा उल्लेख होईलच, तोही जाहीर. नव्हे, तर पुढचा लेख त्याचभोवती असणार आहे.

Wednesday, April 20, 2011

गर्दीत वाट हुडकतोय...




रोज सकाळ होते , मी जागा होतो.

पूर्वीही सकाळ व्हायची मी जागा व्हायचो. उठून शाळेत जायचो , गर्दीत सामील व्हायचो , बे एके बे पासून, १० वि पर्यंत मी गर्दीत चालत राहिलो, लोक वक्तृतव स्पर्धेत भाग घेतात म्हणून मी ही घेत राहिलो , आणि अमुक एक क्लास चांगला आहे म्हणून मी पण जात राहिलो.

शाळा झाली , सगळे ११ वी / १२ वी करतात म्हणून मी ही केली , सगळे जण ढीग भरून फॉर्म भरतात म्हणून मी ही भरत राहिलो. शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो.

१२ वी नंतर सगळे कंप्यूटर क्षेत्रात जातात म्हणून मी पण गेलो. अमुक यांचा तो आणि तमुक यांची ती सध्या एमएनसी कंपनीमधे असते , इतके हजार पगार मिळतो हे ऐकत राहिलो , मी पण त्यांच्यातलाच व्हायच्या तयारीला लागलो.

अरे तो यूएस ला गेला , हा यूके हून आला , तो युरोप मधे सेट्ल झला हे ऐकत मी पण इंजिनियर होत गेलो. सगळे कॅम्पस मधे जातात तसा मी पण गेलो आणि पुन्हा एकदा त्याच गर्दीत एक दिवस सॉफ्टवेर इंडस्ट्री मधे उभा राहिलो.

शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो.

Saturday, April 16, 2011

उपवास



परवा एका मित्राशी गप्पा मारत असताना त्याने मला विचारले ''काय रे ,आज एकादशी ,उपास धरलास की नाही? हे वाक्य ऐकल्यावर मला तर आधी हसूच आले, अर्थात ते मित्रासाठी नाही तर उपास ह्या शब्दाबद्दल. उपास ह्या शब्दाचा संधीविग्रह केल्यास असे लक्षात येईल -

उपास =उप +आस

उप=जवळ जाने /राहणे इ.

आस=इच्छा ,आकांक्षा,मोह इ.

उपास=मोहाच्या जवळ राहणे

आता प्रश्न हा उरतो, मोहाच्या जवळ राहण्यासाठी एखादा वार, तिथी यांचे प्रयोजनच काय? ते तर आपण कधीही राहू शकतोच ना?

Wednesday, April 13, 2011

'अण्णा'मय



विश्वचषक जिंकला. अख्ख्या देशाने आनंद साजरा केला. त्यातून बाहेर पडतो ना पडतो इतक्यात IPL चे ढोल कानावर पडायला लागले. विविध समस्यांनी ग्रासलेल्या शासनाने लोकांना आपल्याच नादात गुंतलेले पाहून जरा निवांत श्वास घ्यावा म्हंटले तितक्यात अण्णा हजारे यांनी आमरण उपोषणाची ललकारी ठोकली. त्र्याहत्तर वर्षांच्या या तरुणाला अशी मैदानात मांड ठोकताना पाहून तरुणांना नवीन नेतृत्व आणि मिडीयाला नवे प्रकरण मिळाल्याचा आनंद झाला आणि सगळ्यांनी या आंदोलनाला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले. स्वातंत्र्याची दुसरी लढाई म्हणवल्या गेलेल्या या जन प्रक्षोभाचे उग्र स्वरूप पाहून शासनाने देखील नमते घेतले आणि आंदोलनाची मूळ मागणी असलेल्या जन लोकपाल बिलासंबंधी ठोस पावले उचलण्याची तयारी दाखवली. एकूणच या पाच दिवसात भल्याभल्यांची हवा टाईट झाल्याचे चित्र उभे राहिले.

अण्णांनी आंदोलनाचे टाईमिंग चपखलपणे साधले. याचे बरेचसे श्रेय अण्णांना एकट्यांना जाते. ती त्यांची खासियत आहे. याचा उद्देश चांगलाच असावा, पण शरद पवार यांच्या शब्दात सांगायचे म्हंटले तर या वेळी अण्णांच्या समाजकारणाला राजकारणाची किनार दिसली. अण्णा यांच्या क्षमतेबद्दल शंकाच नाही. तरी देखील या एकूण आंदोलनाचा करविता धनी कुणी वेगळाच असावा अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. आता जेव्हा शासनाने संयुक्त समिती स्थापन करण्याची मागणी पूर्ण केलेली आहे आणि थकले-भागले अण्णा पुन्हा राळेगणसिद्धीला परतलेले आहेत, या आंदोलनाचे थोडे अवलोकन करायला हरकत नाही.
Related Posts with Thumbnails