सुमारे एप्रिलच्या आसपास आमचे गुर्जी अविनाश वीर आम्हाला येणाऱ्या एका मराठी चित्रपटाबाबत सांगत होते. मी मे-ऑगस्ट भारतात सुट्टीवर येणार असल्याने आम्हा मित्रांचे बरेच प्लान चालले होते. त्यात शाळा आणि हा 'जन गण मन' पाहायचे आम्ही ठरवले होते. दुर्दैवाने दोन्ही सिनेमे रेंगाळले. आता जानेवारीत शाळा प्रदर्शित झाला, जो आता जेव्हा कधी डिविडीवर येईल तेव्हा बघू. पण 'जन गण मन' सिनेमागृहासोबतच इंटरनेटवर प्रदर्शित झाला. जगभरातील मराठी रसिकांसाठी ही फारच उत्कृष्ट सोय होती. अर्थातच आम्ही याचा फायदा उचलायचा ठरवला. भारतात २६ जानेवारी लख्ख उजाडला तेव्हा आमच्याकडे २५ची रात्र होती. रात्री ११ च्या सुमारास 'मुंडू' वरती चित्रपट रेंट करायचा प्रयत्न केला. मुंडूचे पेज सारखे आपले पेपालच्या कुठल्याश्या एरर पेजवर forward व्हायचे. तेवढ्यात आमचे परममित्र अमित यांनी फिल्मऑर्बिट वरून सुद्धा चित्रपट पाहायची सोय असल्याचे कळवले. फिल्मऑर्बिटवर चित्रपट मुंडूवरूनच stream होत होता. पण त्यांची paymenet method जास्त सोपी आणि सरळ होती. ५ मिनिटांत चित्रपट रेंट केला. $३ मध्ये ४८ तासांत कधीही कितीही वेळा बघायची सोय झाली. आणि सुमारे साडे-अकराच्या आसपास चित्रपट चालू केला.

रिकामेपणी काय करायचं? हा प्रश्न मला सहसा नाही पडत. मित्रांच्या मते, मी स्वतःला खूप चांगला रमवतो. कधी एखादा लेख लिहित बसतो, किंवा कविता करतो. पण लिहायला अजूनसुद्धा मला कधी कधी खूप कष्ट घ्यायला लागतात. आवड असली म्हणजे प्रतिभा असते असं थोडीच असतं? फेसबुकवर थोडा वेळ timepass करता येतो. आणि मग उरलेला रिकामा वेळ काढायला - किंवा सार्थ करायला म्हणा - मी सिनेमे बघत बसतो. चित्रपटांचे वेड पहिल्यापासून. हिंदी, इंग्रजी, मराठी सिनेमे तर पाहतोच, पण इतर भाषांतले (subtitles असतील तरच) चांगले सिनेमे सुद्धा आवडीने बघतो. नवीन काही बघायची इच्छा नसेल, किंवा बाकी काही कारण असेल - पण जुने सिनेमे मी खूप बघतो. शोले बघायला तर मी कधीही एका पायावर तयार असतो. गुरुदत्त, शक्ती सामंता, विजय आनंद, प्रकाश मेहरा, चोप्रा बंधू आणि हृषीकेश मुखर्जी अशा लोकांचे चित्रपट पाहत बसणे माझ्यासाठी पर्वणी असते. आजसुद्धा असाच रिकामा बसलो होतो. उद्या कॉलेज चालू होणार, मग आज timepass करायचा शेवटचा दिवस. सहज youtube वर काहीतरी करत बसलो होतो. कुठून तरी डोक्यात एखादी ओळ आली, आणि जुन्या 'वक्त'मधले 'कौन आया के निगाहो में' गुणगुणायला लागलो. म्हंटले, चला आज वक्त बघू. शोधला तर अख्खा चित्रपट एका channel वर मिळाला. यश चोप्राचे हल्ली नाव जरी काढले, तरी निर्माता म्हणून त्याच्या सध्याच्या चित्रपटांमुळे डोकं गरगरतं. पण यश चोप्रा एक दिग्दर्शक म्हणून मला खूप आवडतो. त्याचे जुने सिनेमे पाहिले तर तो काय बाप माणूस होता याची खात्री पटते. याच यश चोप्राने 'वक्त' ज्या पद्धतीने मांडलाय, ते पाहून त्याला सलाम ठोकावासा वाटतो. हेच या लेखाचे प्रेरणा-स्त्रोत.