
सुमारे एप्रिलच्या आसपास आमचे गुर्जी अविनाश वीर आम्हाला येणाऱ्या एका मराठी चित्रपटाबाबत सांगत होते. मी मे-ऑगस्ट भारतात सुट्टीवर येणार असल्याने आम्हा मित्रांचे बरेच प्लान चालले होते. त्यात शाळा आणि हा 'जन गण मन' पाहायचे आम्ही ठरवले होते. दुर्दैवाने दोन्ही सिनेमे रेंगाळले. आता जानेवारीत शाळा प्रदर्शित झाला, जो आता जेव्हा कधी डिविडीवर येईल तेव्हा बघू. पण 'जन गण मन' सिनेमागृहासोबतच इंटरनेटवर प्रदर्शित झाला. जगभरातील मराठी रसिकांसाठी ही फारच उत्कृष्ट सोय होती. अर्थातच आम्ही याचा फायदा उचलायचा ठरवला. भारतात २६ जानेवारी लख्ख उजाडला तेव्हा आमच्याकडे २५ची रात्र होती. रात्री ११ च्या सुमारास 'मुंडू' वरती चित्रपट रेंट करायचा प्रयत्न केला. मुंडूचे पेज सारखे आपले पेपालच्या कुठल्याश्या एरर पेजवर forward व्हायचे. तेवढ्यात आमचे परममित्र अमित यांनी फिल्मऑर्बिट वरून सुद्धा चित्रपट पाहायची सोय असल्याचे कळवले. फिल्मऑर्बिटवर चित्रपट मुंडूवरूनच stream होत होता. पण त्यांची paymenet method जास्त सोपी आणि सरळ होती. ५ मिनिटांत चित्रपट रेंट केला. $३ मध्ये ४८ तासांत कधीही कितीही वेळा बघायची सोय झाली. आणि सुमारे साडे-अकराच्या आसपास चित्रपट चालू केला.
'जन गण मन' कथा आहे एका आदिवासी भागात शिकवणाऱ्या एका शिक्षकाची, त्याच्या शाळेत शिकणाऱ्या एका पारधी पोराची आणि पाल्यावरच्या एका झोपडीत जगू पाहणाऱ्या त्याच्या कुटुंबाची. पारध्यांच्या कपाळावर तर एरवी सुद्धा चोर-जमातीचा शिक्का असतोच. या पारध्यांनी चोऱ्या करायच्या, गावातल्या शेठला (संदीप मेहता) चोरीचं सामान शुल्लक किंमतीत विकायचं आणि शेठने पोलिसांना सांभाळायचं असा साधा हिशोब. शेठला आडवं जाणाऱ्याला शेठ पोलिसांच्या मदतीने आडवा करणार, असा अलिखित नियम. काटू (चिन्मय संत) हा अशाच एका पारधी जोडप्याचा (संतोष जुवेकर, मधुरा वेलणकर-साटम) मुलगा. खिचडी खायला मिळते म्हणून बहीण (अस्मिता जोगळेकर) आणि बाकी पारधी पोरांसोबत शाळेत जाणारा, पण शिकण्याची हौस असणारा. या पारध्यांच्या पोरांच्या शाळेत रामचंद्र सोनटक्के (नंदू माधव) नावाचे मास्तर असतात. या मास्तरांची बायको आणि दोन पोरी त्यांच्या गावी आणि मास्तर इथे शाळेच्या गावी असल्याने मास्तरांची बदलीसाठी धडपड चाललेली. तितक्यात १५ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी तपासणीसाठी खुद्द साहेब येणार असल्याची बातमी येते. बदलीसाठी साहेबांकडे अर्जी करताना त्यांच्यावर चांगली छाप पाडता यावी म्हणून मास्तर स्वातंत्र्य-दिनाच्या कार्यक्रमाची जोरदार आखणी करतो. कवायत, झेंडा-वंदन, राष्ट्रगीत-गान आणि त्यासोबत स्वलिखित नाटक 'रँडचा वध'. मास्तराच्या या तयारीने शाळेतली पोरे हुरळून जातात. आणि मग सुरु होतो मास्तराचा आणि पोरांचा खेळ. अतिशय हलक्या-फुलक्या विनोदी पद्धतीने कथा पडद्यावर साकारत जाते.
जिकडे रोजच्या खाण्या-पिण्याचे हाल, तिकडे स्वतःच्या पोराच्या खुशीसाठी १५ ऑगस्टची तयारी करणारे आई-बाप संतोष-मधुराने उत्कृष्ट वठवलेले आहेत. काटूच्या भूमिकेत चिन्मय संत लक्षवेधी भूमिका करून जातो. पण चित्रपटाचा खरा केंद्र-बिंदू आहे नंदू माधवांनी साकारलेला 'टक्के मास्तर'. मास्तराच्या भूमिकेतून पोरांना पाहताना त्यांच्यातल्या अज्ञानाला स्वतःची चूक मानणारा, पण 'आपल्याला चांगली संधी मिळाली, तर आपण खूप काही करून दाखवू शकतो' या आत्मविश्वासाने वावरणारा मास्तर जेव्हा अगदी basic ज्ञानाबाबत पोरांकडून निराश होतो, तेव्हा आपल्याला यातून बाहेर पडायचे असेल तर यांना मार्गी लावणे महत्वाचे आहे हे समजून चुकतो. स्वातंत्र्य म्हणजे काय? देश म्हणजे काय? आपण कुठल्या देशात राहतो? यापैकी कसलाही गंध नसलेल्या पोरांना स्वातंत्र्याचे महत्व पटवून द्यायला झगडतो. जुलूम म्हणजे काय हे दाखवण्यासाठी 'खडू'चा एक सीन आहे चित्रपटात. तो सीन नंदू माधवांच्या अभिनय-क्षमतेवर असणारा दिग्दर्शकाचा विश्वास अगदी ठळकपणे दाखवतो.
बाकी दिग्दर्शनाबाबत या चित्रपटाला खरेच दहापैकी दहा मिळायला हवेत. एक अशी गोष्ट नाही या चित्रपटात जी पाहणाऱ्याला खटकेल. पारधी जीवन-पद्धतीचा पुरेपूर अभ्यास दिग्दर्शकाने केलेला दिसतो. पारध्यांच्या झोपड्या, त्यांची पाले, कपडे, वावर, बोलण्याची ढब, हाव-भाव यातून फासे-पारध्यांची दैनंदिन संस्कृती (त्यांच्या सगळ्या समस्यांसकट) पडद्यावर जिवंत होते. पहिल्या फ्रेमपासून आपण त्यात इतके गुंतून जातो की पुढचे पावणे-दोन तास चित्रपट आपल्याला अक्षरशः खिळवून ठेवतो. चित्रपटात महत्वाची पात्रे मोजकीच. पण ना त्यांचा परत-परत भडीमार होत राहतो, ना इतर पात्रांचा कथेत फार हस्तक्षेप होतो. यासाठी दिग्दर्शकाला मानायला पाहिजे. कलाकारांची निवड तर योग्य आहेच, शिवाय चित्रपटातील गाणी सुद्धा अशीच उल्लेखनीय आहेत.
चित्रपटात मोजून गाणी तीन. पण सलील-संदीपने तेवढ्यात सुद्धा पुरा जीव ओतलाय. ट्रेलरमध्ये दाखवलेले 'गुर्जी बोलला' तर एकदम खास. सुरुवातीला पाट्या पडताना 'वाऱ्याला या कुणी काही सांगायाला हवं' सुंदर वाटते. आणि नंतर 'शिकायला हवं' म्हणून एक उपरोधात्मक गाणे आहे, ज्याचे timing बघणाऱ्याच्या तोंडून 'वाह' यायलाच लावते. सध्याच्या नवीन ट्रेंडनुसार यात हिंदी-मराठी-इंग्लिशची भेळ नाही. साधे सुंदर शब्द आणि साधी तरल चाल.
आपल्याकडे 'श्वास' नंतर मराठी चित्रपटांत जी लाट आली, त्यात देऊळ, नटरंग, जोगवा, हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि अजून काही मोजके चित्रपट वगळता अधिकतम चित्रपट तर दुर्लक्ष करायच्या लायकीचेच होते. भरत जाधव तर नकोसा झालाय सध्या. मांजरेकर आणि केदार शिंदे यांचे मागील काही सिनेमे पाहिले तर 'दर्शकांना काहीही फालतुगिरी दाखवा, ते बघतील' यावरचा त्यांचा विश्वास स्पष्ट होतो. अशा वेळी मराठी चित्रपट-सृष्टी पुन्हा एकदा बुडतेय की काय अशी शंका येणे साहजिकच आहे. आपले नशीब इतकेच की यातून सुद्धा 'अमित अभ्यंकर सारखे कलाकार 'जन गण मन' सारखी कलाकृती सादर करण्याची मेहनत घेतात आणि शिवाय चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्याची काळजीही घेतात. यालाच बहुतेक म्हणतात 'मराठी पाऊल पडते पुढे'.....
वैभव गायकवाड

















2 comments:
उत्कृष्ट लेख, वैभव! खरच एक वेगळा विषय दिसतोय चित्रपटाचा! वेळ काढून बघायला हवा.
मात्र एक म्हणावेसे वाटते. चांगले प्रवाह आणि वाईट प्रवाह हे फक्त मराठी चित्रपटात आहेत असे नाही. हिंदी चित्रपट जरी बघितले तरी काही मोजके सोडून बाकी 'भंगार' ह्याच लायकीचे असतात की. हिंदी इंडस्ट्री ही जास्त hyped असल्यामुळे त्यांचे पाऊल मागे पढते की पुढे ह्याची कुणी चर्चा करत नाही एवढेच! ;) आणि हे तुला देखील पटेल म्हणा. :)
उत्कृष्ट लेख, मला आवडला लेख. आणि मम्मीला सुद्धा.....
Post a Comment