Vaibhav Gaikwad's Blog

Monday, January 16, 2012

'वक्त'चा अनुभव


रिकामेपणी काय करायचं? हा प्रश्न मला सहसा नाही पडत. मित्रांच्या मते, मी स्वतःला खूप चांगला रमवतो. कधी एखादा लेख लिहित बसतो, किंवा कविता करतो. पण लिहायला अजूनसुद्धा मला कधी कधी खूप कष्ट घ्यायला लागतात. आवड असली म्हणजे प्रतिभा असते असं थोडीच असतं? फेसबुकवर थोडा वेळ timepass करता येतो. आणि मग उरलेला रिकामा वेळ काढायला - किंवा सार्थ करायला म्हणा - मी सिनेमे बघत बसतो. चित्रपटांचे वेड पहिल्यापासून. हिंदी, इंग्रजी, मराठी सिनेमे तर पाहतोच, पण इतर भाषांतले (subtitles असतील तरच) चांगले सिनेमे सुद्धा आवडीने बघतो. नवीन काही बघायची इच्छा नसेल, किंवा बाकी काही कारण असेल - पण जुने सिनेमे मी खूप बघतो. शोले बघायला तर मी कधीही एका पायावर तयार असतो. गुरुदत्त, शक्ती सामंता, विजय आनंद, प्रकाश मेहरा, चोप्रा बंधू आणि हृषीकेश मुखर्जी अशा लोकांचे चित्रपट पाहत बसणे माझ्यासाठी पर्वणी असते. आजसुद्धा असाच रिकामा बसलो होतो. उद्या कॉलेज चालू होणार, मग आज timepass करायचा शेवटचा दिवस. सहज youtube वर काहीतरी करत बसलो होतो. कुठून तरी डोक्यात एखादी ओळ आली, आणि जुन्या 'वक्त'मधले 'कौन आया के निगाहो में' गुणगुणायला लागलो. म्हंटले, चला आज वक्त बघू. शोधला तर अख्खा चित्रपट एका channel वर मिळाला. यश चोप्राचे हल्ली नाव जरी काढले, तरी निर्माता म्हणून त्याच्या सध्याच्या चित्रपटांमुळे डोकं गरगरतं. पण यश चोप्रा एक दिग्दर्शक म्हणून मला खूप आवडतो. त्याचे जुने सिनेमे पाहिले तर तो काय बाप माणूस होता याची खात्री पटते. याच यश चोप्राने 'वक्त' ज्या पद्धतीने मांडलाय, ते पाहून त्याला सलाम ठोकावासा वाटतो. हेच या लेखाचे प्रेरणा-स्त्रोत.



वक्त चालू होतो गडगंज श्रीमंत 'लाला केदारनाथ'च्या घरात. बलराज साहनीने निभावलेल्या या पात्राच्या घरी त्याच्या तिन्ही मुलांचा योगायोगाने एकाच दिवशी असणाऱ्या वाढदिवसाचा सोहळा चालू असतो. इथेच ते प्रसिद्ध 'ओ मेरी जोहरा-जबीन' गाणे आहे. या प्रसंगी लाला केदारनाथ'ला एकजण सांगत असतो की काळाचा खेळ खूप विचित्र असतो. राजाला रंक आणि रंकाला राजा बनायला वेळ लागत नाही. आपल्या खुशीत मश्गुल लाला काळ आपले काही वाकडे करू शकत नाही, असे छाती ठोकून सांगतो. लालाच्या दुर्दैवाने त्याच रात्री मोठा भूकंप होतो. संपूर्ण गाव त्यात उध्वस्त होते. तत्कालीन हिंदी चित्रपटांच्या फॉर्म्युल्यानुसार लाला, त्याची पत्नी लक्ष्मी (अचला सचदेव) आणि तीन मुले एकमेकांपासून दुरावतात. मोठा मुलगा राजू, अनाथाश्रमात जातो. तिथे मॅनेजर (जीवन) त्याला मारहाण करतो, म्हणून तिकडून पळून मुंबईला येतो. खिसेकापू बनतो. तिथून त्याला चिनॉय (रेहमान) उचलतो आणि एक अट्टल चोर बनवतो. लाखोंच्या चोऱ्या करणारा हा राजा (राजकुमार), एरवी मात्र नरीमन पॉइन्टला श्रीमंतांच्या परिसरात दानशूर पैसेवाल्याचे आयुष्य जगत असतो. शेजारच्या न्यायाधीशाच्या मुलीशी (साधना) याची भेट होते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. लाला भूकंपानंतर आपली पोरे शोधत अनाथाश्रमात गेल्यावर तिथे त्याला कळते की त्याचा मोठा मुलगा राजा इथेच होता, पण मॅनेजरच्या मारहाणीला वैतागून तिथून पळून गेलाय. संतापलेला लाला मॅनेजरचा गळा आवळतो आणि त्याच्या हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात जातो. दुसरा मुलगा रवी दिल्लीच्या एका निसंतान उद्योगपतीला रस्त्यात बेशुद्ध पडलेला सापडतो. तो त्याला आपल्यासोबत दिल्लीला घेऊन जातो. शिकवून मोठा वकील बनवतो. हा रवी (सुनील दत्त) मुंबईत वकिली करायला येतो आणि न्यायाधीशाच्या पोरीचं - मीनाचं आणि याचं प्रकरण जुळतं. आधी निसंतान असलेल्या या उद्योगपतीला नंतर एक मुलगी 'रेणू' (शर्मिला टागोर) झालेली असते. तिसरा मुलगा विजय आईसोबत असतो. लाला भूकंपात मेला असे समजून, लक्ष्मी या मुलाला शिकवून बी.ए. करते, आणि हा मोठा झालेला विजय (शशी कपूर) दिल्लीला रेणूच्या प्रेमात पडतो. लक्ष्मीच्या आजारपणामुळे विजय तिला मुंबईला टाटामध्ये उपचार करायला घेऊन येतो. २० वर्षांनंतर लाला तुरुंगातून सुटतो. एका मित्राकडून त्याची बायको दिल्लीला असल्याचे त्याला कळते. दिल्लीला त्याला बायको मुंबईला गेल्याची माहिती मिळते. आणि लालासुद्धा मुंबईला येतो.


इथपर्यंत सगळा असाच गोंधळ आहे. इथून पुढे चालू होतो चित्रपटाचा प्रवास. चार वाटा फुटलेले हे कुटुंब २० वर्षांनी लाला तुरुंगातून सुटल्यावर बऱ्याचदा एकमेकांच्या संगतीत येते. पण त्यांचे एकमेकांशी नाते काय आहे ते माहित नसल्याने ओळख पटण्याचा संबंध येत नाही. एकूणच कथेत गुंतागुंत इतकी आहे, की चित्रपट न बघितलेल्या माणसाला जर कथा सांगायची म्हंटले तर सांगणारा आणि ऐकणारा दोघे पागल होतील. पण इथेच दिग्दर्शकाचे कौशल्य दिसते. चित्रपट पाहताना इतके क्लिष्ट सीन इतक्या उत्कृष्टपणे सादर केलेले आहेत की आपण थक्क होऊन जातो.



कलाकारांच्या बाबतीत सांगावे तर शशी कपूरचे याआधी ७-८ सिनेमे येऊन गेले होते. शर्मिला टागोरसुद्धा हिंदी चित्रपट-सृष्टीत फक्त एक चित्रपट जुनी, म्हणजे तशी नवीनच होती. वक्तने chitया दोघांना ओळख मिळवून दिली.साधना या चित्रपटात नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर दिसते. तिचा यात एक स्विमिंग सुटवाला एक सीन आहे. Theatrical release च्या वेळी हा सीन सेन्सॉरने कापायला लावला होता. नंतर जेव्हा वक्त VHS वर (आठवतंय का काय असतं ते) आला, तेव्हा हा सीन चित्रपटात पुन्हा सामील करण्यात आला. सुनील दत्त भले सिनेमात वकील दाखवला आहे, पण निदान ७०% चित्रपटात तरी त्याचा आणि वकिलीचा काही संबंध नाही. चष्मे-बख्तार, गुले-गुलजार करत तो अख्ख्या सिनेमात साधनाच्या पुढे-मागे फिरत असतो. पण त्याची आणि साधनाची केमिस्ट्री चांगली जुळलेली आहे. साधनावर एकतर्फी प्रेम करणारा राजा राजकुमारने उत्कृष्टपणे वठवलेला आहे. खुद्द राजकुमार या सिनेमाचा युनिक सेलिंग पॉइन्ट आहे म्हंटले तरी चालेल. त्याचे दोन सुप्रसिद्ध संवाद - 'ये चाकू है, बच्चोंके खेलनेकी चीज नहीं. हाथ लग जाए तो खून निकल आता है' आणि 'चिनॉयसेठ, जिनके खुदके घर शिशेके होते है, वोह दूसरोंके घरपे पत्थर नहीं फेका करते', याच चित्रपटातले आहेत. चिनॉयसेठच्या भूमिकेत रेहमान भाव खाऊन जातो.



बलराज साहनीचा लाला म्हणजे काळाने श्रीमुखात भडकावलेल्या सामान्य माणसाचे प्रतिबिंब आहे. एका सीनमध्ये लाला चौपाटीवर बसून चुपचाप चणे खात असलेला दाखवलाय. जवळपास काही नाही. एक-एक चणा पुडीतून सांभाळून, खाली पडू न देण्याची काळजी करत खातोय. एकेकाळचा गडगंज श्रीमंत असा चौपाटीवर चणे खाऊन पोट भरतोय, हे दाखवताना त्याच्या चेहऱ्यावर जी लाचारी आहे ती बघून क्षणभर अंगावर शहारा येतो. इतका गंभीर, पण छोटासा सीन यश चोप्रा आणि बलराज साहनीने इतका मस्त जमवलाय, की एकही संवाद न बोलता लालाच्या सगळ्या जखमा उघडून आपल्यासमोर येतात. लालाच्या पत्नीच्या भूमिकेत अचला सचदेवला फारसा काही स्कोप नाहीये, पण ठीक आहे.

यात राजकुमार आणि सुनील दत्त यांच्यात रेसिंगचा एक सीन आहे. नरीमन पॉइन्टपासून थेट खंडाळ्यापर्यंत. हा सीन इतका उत्कृष्ट घेतलेला आहे की बघणारा पूर्ण वेळ श्वास रोखून बसलाच पाहिजे. याचे execution दोन्ही धूममधल्या ओढून-ताणून दाखवलेल्या रेसिंग्सपेक्षा भारी आहे. शिवाय जुन्या मुंबईचे दर्शन घडते ते वेगळेच. चित्रपटाच्या शेवटी असलेला कोर्टरूम-ड्रामा देखील असाच क्लास. एकूण तीन तासाच्या या सिनेमात अशी बरीच दृश्ये आहेत, जिथे आपल्या तोंडून सादरकर्त्यासाठी नकळतच 'वाह' निघून जाते.

साहीर लुधियानवी या माणसाबाबत मी काय बोलणार? त्याची गाणी म्हणजे भारतीय चित्रपट-सृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न आहे. संगीतकार म्हणून रवी इतका मोठा कधीच झाला नाही, पण महेंद्र कपूरच्या आवाजातली त्याची गाणी आजही अतिशय गोड वाटतात. आज और कल, खानदान, हमराज सारखे सांगीतिक योगदान देणाऱ्या या कलाकाराने वक्तची गाणी सुद्धा तितक्यात गोडव्याने सादर केली आहेत. 'दिन है बहार के', 'कौन आया के निगाहों में चमक जाग उठी', 'हम जब सिमटके आपके बाहों में आ गए' सारख्या प्रणय-गीतांसोबत 'ओ मेरी जोहरा-जबीन' सारखी कव्वाली आणि 'वक्त के दिन और रात', 'आगे भी जाने न तू' सारखी खोल, गंभीर गाणीसुद्धा तितक्याच कौशल्याने जमवलेली आहेत.

असे म्हणतात की बी.आर.चोप्रांनी जेव्हा वक्त करायचे ठरवले, तेव्हा लालाच्या भूमिकेत पृथ्वीराज कपूर, आणि त्यांच्या तीन मुलांच्या भूमिकेत अनुक्रमे राज, शम्मी आणि शशी कपूर यांना डोळ्यासमोर ठेवून कथा develop करवली. काही कारणास्तवे ते होऊ शकले नाही. पण आजही वक्त बघताना या तीन व्यक्तिरेखा त्याच हिशोबाने लिहिल्याचे ध्यानात येते. तसे घडले असते, तर 'वक्त' अगदीच वेगळ्या कारणासाठी 'one of a kind' ठरला असता. त्याव्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच बाबतीत 'वक्त' pioneer ठरलेला आहे. भारतीय चित्रपट-सृष्टीला 'lost and reunite' चा यशस्वी मंत्र या चित्रपटातून मिळाला. वक्त भारतातला पहिला multistarrer सिनेमा ठरला. पळता-पळता मोठा होणारा नायक दाखवायची पद्धत यातून आली. चलन-वृद्धीच्या दृष्टीने 'मुघले-आझम' नंतर वक्तची कमाई सर्वात जास्त मानली जाते. ब्रिटीश फिल्म इंस्टिट्युटने 'वक्त'चा समावेश भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वोत्तम दहा चित्रपटांमध्ये केलेला आहे. फिल्म-फेअरने सुद्धा वक्तला चित्रपट, दिग्दर्शन (यश चोप्रा), नायिका (साधना), सहनायक (राजकुमार), कथा (अख्तर मिर्झा), संवाद (अख्तर उल इमान), सिनेमॅटोग्राफी-रंगीत (धरम चोप्रा) अशा तब्बल सहा विभागासाठी मानांकन दिलेले आहे.


वाईन जशी जुनी होत गेल्यावर तिची मजा वाढत जाते, तसेच काही या चित्रपटांबाबत आहे. काळाच्या कसोटीवर पुरेपूर उतरलेल्या अशा चित्रपटांनी आपले आयुष्य समृद्ध केले आहे. आज सत्तेचाळीस वर्षांनंतर सुद्धा वक्तची जादू तशीच कायम आहे. काळाच्या ओघात यश चोप्रा मात्र हरवलाय. त्याने पुन्हा एकदा मांडी ठोकून मैदानात उतरावे आणि दिग्दर्शक म्हणून आपल्या सारख्यांसाठी काहीतरी अप्रतिम करून दाखवावे ही एक इच्छा कायम मनात राहील. माझ्या आणि इतर चाहत्यांच्याही.

वैभव गायकवाड

Bookmark and Share

4 comments:

वैभव गायकवाड said...

khup chhan daha minitat sagala pict dakhavlas thanks i like..........................mummy

वैभव गायकवाड said...

वक्त मी नाही पाहिला अजून. पण ब्लॉग मस्त. ब्लॉग वाचून वाटले की यश चोप्राला एकदा 'वक्त' दाखवला पाहिजे. म्हणजे त्याला कळेल की तो आजकाल किती भिक्कारडे सिनेमे बनवतो ते! लोळ 

वैभव गायकवाड said...

ekdum zhakaas jiju

वैभव गायकवाड said...

ekdum zhakaas jiju

Post a Comment

Related Posts with Thumbnails