Vaibhav Gaikwad's Blog

Wednesday, August 31, 2011

Top 10 of August '11






नमस्कार मित्रांनो, आज या महिन्याचा Top 10 चा लेख प्रकाशित करताना ईदचा शुभ-मुहूर्त मिळाला. सगळे सुट्टी घेऊन आज घरी असतीलच, शिवाय उद्यापासून गणेशोत्सव देखील आहे. चाकरमान्यांपासून खंडणी-बहाद्दूर मंडळापर्यंत सर्वांनी गणपतीच्या स्वागताची तयारी केली असेलच. म्हणून या लेखाला सुरुवात करण्याआधी वैभव गायकवाड आणि परिवारातर्फे सर्वांना ईद आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.

ऑगस्ट महिना सुरु होताना काही खास होईल असं वाटत नव्हतं. हा, मी भारतातून इकडे येणार होतो परत, नवीन सत्र सुरु होणार होते, पण या अपेक्षित गोष्टींखेरीज काही खास होईल असं वाटलं नव्हतं. अर्धा महिना उलटून गेला आणि धक्कादायक बातमी आली - शम्मी कपूर वारल्याची. त्याच्या वयोमानानुसार हे होणार होतेच, पण सगळ्याच घटनांना आपले मन स्वीकारत नाही. शम्मी कपूर होता तेव्हा जितकं त्याबद्दल खास वाटलं नाही, त्याहून कितीतरी जास्त वाईट वाटलं तो गेल्यावर. कपूर घराण्याची घराणेशाही पाहता 'राज कपूर' त्यांचा छत्रपती होता, पण शम्मी रूढार्थाने त्यांचा 'प्रिन्स' होता. तो त्याच रुबाबात जगला आणि त्याच ऐटीत त्याने एक्झिट घेतली. वर्षानुवर्षे बिछान्यात खितपत पडून मृत्यूची वाट बघत बसणे त्याचा स्वभावात बसले देखील नसते. शम्मी कपूर वरती एक खूप चांगली 'biography' राजश्रीने केली आहे. ती निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. मी खाली जोडत आहे, वेळ मिळाला तर जरूर पहा.

Sunday, August 7, 2011

दादा कोंडके



दादा कोंडके - नाव घेताच नाक मुरडायची आपल्याकडे फॅशन आहे. अतिसाधारण चेहरा, अगदी माथाडी कामगारांसारखा अवतार, कंबरेला लटकणारी हाफ-चड्डी आणि किंचित अस्पष्ट आवाजातले द्विअर्थी संवाद याहून वेगळी अशी ओळख लोकांना नसते, आणि त्यांना ती तशीच ठेवायची असते. सर्वसाधारणपणे या लोकांना इतकीही कल्पना नसते, की मल्टी- प्लेक्सच्या बाहेर देखील रसिक जनता असते. जे या लोकांना आज कळत नाही, ते दादांना त्यावेळी कळले होते, आणि त्यांनी या जनतेची नाडी अचूक पकडली होती म्हणूनच सलग नऊ चित्रपटांच्या रौप्य-महोत्सवाने मराठी चित्रपटाची गुढी गिनीज बुकात रोवली. पण हे आजच्या यश चोप्रा, करण जोहरच्या अनुयायांना कळत नाही, हे समाजाचे दुर्भाग्य. त्यात मराठी चित्रपटांबद्दल असणारी अनास्था. हिंदी चित्रपट आवडीने बघणाऱ्या मराठीजनांना हे माहित असतं की रजनीकांत अमिताभचा बाप आहे, आणि उत्तर भारतात रविकिशन शाहरुखला कच्चा खातो, पण मराठी सिनेमाला कधी हिंदी इतका भाव देत नाहीत. राज कपूरचं, गुरुदत्तचं, विजय आनंदचं नाव हे लोक अदबीने घेतात, पण 'प्रभात' यांना माहित नसते. (ज्यांना विजय आनंद वा गुरुदत्तसुद्धा माहित नसतो, त्यांना आपण जाहीर फाट्यावर मारतो) दादांच्या बाबतीत हे देखील झालं, शिवाय जाणीवपूर्वक हेटाळणी झाली ती वेगळीच.

Monday, August 1, 2011

Top 10 of July'11



हुश्श! शेवटी एकदाचा वेळ मिळाला ब्लॉगकडे बघायला. इथे मुंबईत आल्यापासून तर रोज धावपळ....भेटाभेटी आणि सरकारी कामे - आणि त्यासाठी मुंबईच्या रस्त्यांतून जीवघेणा प्रवास. हे कमी होतं की काय, आता पावसाने थैमान घातलंय. आजसुद्धा सकाळी वरळी, तिकडून एअरपोर्ट, मग नेरूळ आणि संध्याकाळी कल्याण असा बेत होता. जास्त ताप नको म्हणून कल्याणचं काम रद्द केलं आणि वरळीला जायला निघालो. ऐरोलीतून बाहेर पडलो, पूर्व द्रुतगती महामार्ग (Eastern Express) पकडला आणि तुफान पाऊस चालू झाला. जेमतेम कन्नमवारपर्यंत गेलो, तिथून पुढे अमर-महालच्या पुलापर्यंत ट्रॅफिक. पाऊस तर होताच, पण आजचे श्रेय तर प्राधिकरणाच्या रस्ते-दुरुस्ती पथकाला ज्यांनी ऐन पुलावर सहा बाय सहाचा ब्लॉक अडवून, तिकडे खोदकाम चालवलं होतं. बहुतेक पेवर-ब्लॉक बसवत होते. थोडा अजून पुढे गेलो तर प्रियदर्शिनीची ट्रॅफिक. त्यातून कसाबसा सुटलो तर सायन सर्कलची ट्रॅफिक. तिकडून पुढे जात-जात सायनचा तो एकपदरी पूल पार केला आणि खाली बघतो तर जिकडे बघेल, तिकडे गाड्याच गाड्या. डोकंच सटकलं. म्हंटले आता खड्ड्यात गेलं सगळं काम. गाडी फिरवली आणि घरी आलो. जाऊन येऊन माझे तीन तास गेले. काम तर काहीच नाही, पण उगाच पेट्रोल जाळून आलो.
Related Posts with Thumbnails