Vaibhav Gaikwad's Blog

Tuesday, May 15, 2012

खादाडीचा इतिहास





इतिहास माझा मुळात आवडता विषय. सनावळ्या कधी लक्षात नाही राहिल्या, तरी कुठली तरी एखादी गोष्ट अशी घडून गेली ज्यामुळे आजही आपण काही उपचार पाळतो, हे कळण्यातला आनंद इतिहासातून खूप मिळाला. आजच्या लेखातून इतिहासातील क्लिष्ट घटना चघळायचा उद्देश अजिबात नाही. उलट आपल्या आजच्या अजून एका आवडीच्या विषयाचा इतिहासात संदर्भ धुंडण्याचा प्रयत्न. आणि ती गोष्ट म्हणजे - खाणे.

परंपरागत खाद्यपदार्थ म्हणा वा काही प्रसंगनिष्ठ पदार्थ, प्रत्येकामागे असेच एखादे कारण असते. एरवी खाताना आपण कसलाच विचार करत नाही. पण हा पदार्थ असाच का बनवतात आणि आपण तो कधीपासून खातोय हे जाणून घेणे खरेच मजेशीर असते. जसं गायीचे दुध भलेही आज आपल्या दैनंदिन जीवनातला महत्वाचा भाग आहे. पण मागे एकदा कुठे तरी वाचले होते, कुणी सर्वप्रथम असा विचार कसा केला असेल की 'ते जे गाईच्या खाली लोम्बतंय, ते पिळावं आणि त्यातून जे काही बाहेर येईल ते प्यावं'? विनोदाचा भाग सोडला, तरी कुतूहल माणसाला छळत राहतंच. आणि मग मागे एकदा माझ्या पानिपतच्या लेखात संक्रांतीला तीळगुळ खाण्याचा उल्लेख आलेला, त्यावरून बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांना कधी कल्पनाही नव्हता की या तीळगुळ प्रकरणाचा पानिपतच्या पराभवाशी काही संबंध असेल. असेच एक दोन प्रसंग घडून गेले. आणि मग शेवटी हा लेख साधत गेला.

आपला पहिला खाद्यप्रकार - पुरणपोळी. खूप वर्षांपूर्वी एकदा टीवीवर 'खानाखजाना'मध्ये संजीव कुमारने पुरणपोळीच्या शोधाबद्दल सांगितलं होतं. जर कृष्णाच्या मृत्यूबद्दल तुम्ही वाचलं किंवा ऐकलं असेल, तर यादवी युद्धानंतर, गांधारीच्या शापाप्रमाणे संपूर्ण कुलनाश झालेला कृष्ण घरदार सोडून जंगलात भटकत फिरत होता. असाच दमून-भागून तो एका झुडुपाच्या आडोशाने झोपला होता. जारा नावाच्या एका आदिवासीने कृष्णाच्या गेरुमुळे लालभडक असलेल्या पायाला हरीण समजून बाण मारला. ही पायाची जखम नंतर भरपूर चिघळत जाऊन कृष्ण सेप्टिकने हाल-हाल होऊन मेला. या सगळ्या डीटेल्स माहित असूनही त्याची पहिल्यांदा लॉजिकली लिंक लागली जेव्हा संजीव कुमारने सांगितलं की कृष्ण मधुमेही होता. मधुमेह असल्याने त्याला त्याच्याच घरात गोड खायची बंदी होती. कृष्ण स्वतः उत्तम स्वयंपाकी होता. त्यानेच शक्कल लढवली की गोड काहीतरी गुपचूप पोळीमध्ये भरून ठेवायचं. पुरणाचा शोध त्याने लावला की नाही माहित नाही, पण basic idea त्याचीच. मग जेवायला बसताना बाकीचे साधी चपाती खायचे, आणि हा कृष्ण त्याची पुरण भरलेली पोळी खात बसायचा. कुणाला कधी कळायचं नाही कारण पोळी आणि पुरणपोळी यांतला फरक नुसता बघून ओळखता यायचा नाही. असाच पुरणपोळीचा शोध लागला. आहे की नाही interesting?

असाच महाभारतातला नामचीन आचारी म्हणजे पाकशास्त्रात ज्याला बल्लवाचार्य म्हणून पूजतात तो भीम. त्याच्या पाककौशल्याच्या कथा महाभारतात बऱ्याचदा येतात. विराटाघरी 'बल्लव' म्हणून काम करताना भीमाने स्वतःच्या पाककलेचे धडे इतर स्वयंपाकी दासांना द्यावेत म्हणून खुद्द विराट राजाने मागणी केली होती. या भीमाच्या खुराकाचे किस्से सुद्धा भलतेच फेमस आहेत. भीम रोज इतकं हे खायचा, तितकं ते प्यायचा अशी वर्णने सुद्धा आपण वाचत असतोच. रोजचे भरपूर दुध आणि काजू-बदाम असा मेवा दाबून पचवणाऱ्या भीमाने एक अलौकिक पदार्थ शोधून काढला. दुध, काजू, बदाम, केसर, साखर आणि भरपूर तूप - आणि तयार झाली खीर....आज या सगळ्या कच्च्या मालांच्या किंमती गगनाला भिडल्याने खीर फक्त एक उत्सवी पदार्थ म्हणून उरलाय. :(

१६ व्या शतकात मुघल साम्राज्यात भयानक दुष्काळ पडला. शहेनशाह अकबर जो आपल्या कर्तव्यनिष्ठ शासनाबाबत मानला जातो, त्याने बाहेरून अन्न-धान्य मागवले आणि शहरात रस्ते-बांधणीचं आणि तटबंदी बांधणीचं काम सुरु केलं. हिशोब साधा - जो कामाला येईल, त्याला त्या दिवसाचं राशन मिळणार. दिवसभर काम करून थकलेली माणसे रात्री कुठे चार वेगळे प्रकार करत बसणार? ५-१० जण एकत्र येऊन मोठ्या भांड्यांत मिळालेलं सगळं राशन (भातासकट) एकत्र शिजवायचे. त्यातून पुलावचा जन्म झाला. एकदा शहेनशाह अकबर रात्री वेश बदलून फिरत असताना त्याच्या नजरेत हा प्रकार आला. त्याने त्यात अजून काही बदल केले आणि बिर्याणी जन्माला आली. आणि मुघली साम्राज्यासोबत हे दोन्ही पदार्थ भारतभर पसरले.

आपल्या यादीतला शेवटचा पदार्थ जन्माला आला थेट १६८५ मध्ये. महाराजांना जाऊन जेमतेम चार वर्षे झाली होती. साम्राज्याचे तुकडे होत असताना सुद्धा अवघ्या सत्तावीस वर्षांचे संभाजी महाराज आठ वेगवेगळ्या आघाड्यांवर युद्धे लढवीत होते. त्यातच म्हैसूरच्या चिक्क देव रायाने मराठी हद्दीत घुसखोरी चालू केली. बोलणीसाठी पाठवलेल्या राजदूताच अपमान केल्यावर महाराज भडकले आणि थेट म्हैसूरवर चाल करून गेले. म्हैसूरला वेढा घालून बसल्यावर बोलाचाली परत सुरु झाल्या. चिक्क देव राया ऐकत नाही म्हंटल्यावर महाराजांनी म्हैसूरवर हल्ला करायला एक नवीन योजना काढली. इंग्रजांकडून मिळालेल्या दारू-गोळ्याच्या जीवावर चिक्क देव राया उडत होता. मराठी सैन्याने बाणाच्या टोकाला कापडाचे बोळे लावले, त्यावर तेल ओतलं, पेटवले आणि थेट दारू-गोळ्याच्या भांडारावर हल्ला केला. तासाभरात म्हैसूर पडले. याच घटनेतून नंतर अग्निबाण हा शब्द रूढ झाला. पण आपल्या कामाची गोष्ट या सगळ्या प्रकरणाला समांतर जाते. या एकूण मुक्कामात महाराजांचे खाण्याचे वांदे झाले. महाराजांना रोजच्या आमटीत कोकम लागत असे. तिथे कोकम मिळेना. शिवाय वेढा घालून बसलेले सैन्य. काहीतरी खायची सोय करायला हवीच ना त्यांची? शेवटी स्थानिक बाजारात मिळणाऱ्या सगळ्या भाज्या एकत्र करून, कोकमच्या बदल्यात स्थानिक पर्याय म्हणून चिंच टाकून रोज जेवण बनवायची कल्पना महाराजांनी काढली. हा पदार्थ बघता बघता प्रचंड फेमस झाला आणि 'संभाचे सार' नंतर 'सांभार' म्हणून आपल्या जेवणात आले. इथून पुढे एखाद्या दक्षिणी मित्राने सांभारची प्रौढी मिरवली की त्याला काय सांगायचं ते कळलं ना?

जाता-जाता फक्त इतकंच, की हा १४९ वा लेख आहे. पुढच्या लेखात भेटू तडाख्याने..... शतकोत्तर पन्नाशी साजरी करायला. तोपर्यंत.. खाओ, पिओ, मज्जा करो... ;)

वैभव गायकवाड


Bookmark and Share

1 comments:

वैभव गायकवाड said...

The anecdotes you have narrated are apocryphal. Biryani existed at least 1000 years before Shahjehan. I would suggest you read books by T. K. Achaya.

Post a Comment

Related Posts with Thumbnails