काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. कामावरून घरी चाललो होतो. सिग्नलला माझ्या पुढे एक २०११ ची फोर्ड मस्टँग होती. सिग्नलला थांबल्यामुळे आजूबाजूला बघत बसण्याशिवाय दुसरे काही काम नव्हते. सहज लक्ष गेलं मस्टँगच्या पेट्रोलच्या टाकीच्या झाकणाकडे. मस्टँगवाला नुकताच कुठून तरी पेट्रोल भरून निघाला असावा. आणि गडबडीत पेट्रोलच्या टाकीचे झाकण लावायला विसरला असावा. त्याच्या टाकीचा मेटल flap उघडा होता, शिवाय आतली रबरी कॅपसुद्धा बाहेर लटकत होती. हा बहुतेक पेट्रोल भरून सरळ गाडीत बसला आणि ते बंद न करता थेट निघाला, असा माझा अंदाज. विचार केला की आताच उतरावं आणि त्याच्या खिडकीला टकटक करून त्याला सांगावं. तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला आणि गाड्या हलल्या. सिग्नल, मग ते भले कुठल्याही देशातले असेनात, आपण जेव्हा गडबडीत असतो तेव्हा नेहमी लाल असतात, आणि जेव्हा थांबून काही करायची गरज असते तेव्हा हमखास हिरवे असतात. पिवळ्या सिग्नलला एरवीही कुणी किंमत देत नाही म्हणा.
तर मी त्या मस्टँगच्या मागून निघालो. आता खरंच असं होतं की नाही मला माहित नाही, पण समोरची गाडी जशी हलेल तसं त्या टाकीच्या उघड्या तोंडातून पेट्रोल बाहेर सांडत असल्यासारखे मला वाटत होते. आम्ही दोघे डाव्या लेनमध्ये होतो. मी उजव्या लेनला गाडी टाकली आणि खेचून त्या मस्टँगच्या बरोबरीला आणली. साठीच्या आसपासचा एक म्हातारा ती मस्टँग चालवत होता. हे म्हातारे लोक अशा स्पोर्टस-कार का चालवत असतील असा मला नेहमी प्रश्न पडतो. बहुतेक शोरूमवाले त्यांना 'उतारवयात चालवण्यासाठी आरामदायक गाडी' देण्याऐवजी कमिशन जास्त म्हणून अशा स्पोर्टस-कार चिकटवत असतील किंवा पान पिकलं तरी देठ अजून हिरवा असल्याने तरुण पोरींना किंवा सेकंड हँड बायकांना भुलवण्यासाठी या म्हाताऱ्यांचाच हा खटाटोप असावा. असो.















