काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. कामावरून घरी चाललो होतो. सिग्नलला माझ्या पुढे एक २०११ ची फोर्ड मस्टँग होती. सिग्नलला थांबल्यामुळे आजूबाजूला बघत बसण्याशिवाय दुसरे काही काम नव्हते. सहज लक्ष गेलं मस्टँगच्या पेट्रोलच्या टाकीच्या झाकणाकडे. मस्टँगवाला नुकताच कुठून तरी पेट्रोल भरून निघाला असावा. आणि गडबडीत पेट्रोलच्या टाकीचे झाकण लावायला विसरला असावा. त्याच्या टाकीचा मेटल flap उघडा होता, शिवाय आतली रबरी कॅपसुद्धा बाहेर लटकत होती. हा बहुतेक पेट्रोल भरून सरळ गाडीत बसला आणि ते बंद न करता थेट निघाला, असा माझा अंदाज. विचार केला की आताच उतरावं आणि त्याच्या खिडकीला टकटक करून त्याला सांगावं. तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला आणि गाड्या हलल्या. सिग्नल, मग ते भले कुठल्याही देशातले असेनात, आपण जेव्हा गडबडीत असतो तेव्हा नेहमी लाल असतात, आणि जेव्हा थांबून काही करायची गरज असते तेव्हा हमखास हिरवे असतात. पिवळ्या सिग्नलला एरवीही कुणी किंमत देत नाही म्हणा.
तर मी त्या मस्टँगच्या मागून निघालो. आता खरंच असं होतं की नाही मला माहित नाही, पण समोरची गाडी जशी हलेल तसं त्या टाकीच्या उघड्या तोंडातून पेट्रोल बाहेर सांडत असल्यासारखे मला वाटत होते. आम्ही दोघे डाव्या लेनमध्ये होतो. मी उजव्या लेनला गाडी टाकली आणि खेचून त्या मस्टँगच्या बरोबरीला आणली. साठीच्या आसपासचा एक म्हातारा ती मस्टँग चालवत होता. हे म्हातारे लोक अशा स्पोर्टस-कार का चालवत असतील असा मला नेहमी प्रश्न पडतो. बहुतेक शोरूमवाले त्यांना 'उतारवयात चालवण्यासाठी आरामदायक गाडी' देण्याऐवजी कमिशन जास्त म्हणून अशा स्पोर्टस-कार चिकटवत असतील किंवा पान पिकलं तरी देठ अजून हिरवा असल्याने तरुण पोरींना किंवा सेकंड हँड बायकांना भुलवण्यासाठी या म्हाताऱ्यांचाच हा खटाटोप असावा. असो.
दोन्ही गाड्या जशा समांतर जाऊ लागल्या तसं मी त्या मस्टँगवाल्याकडे बघून हातवारे चालू केले, त्याचं लक्ष वेधण्यासाठी. त्याने माझ्याकडे पाहिलं. थम्स अप करताना आपण अंगठा बाहेर काढून मुठ वळतो ना, तशी डावी मुठ वळून, अंगठा त्याच्या गाडीच्या पेट्रोल-टाकीच्या दिशेला करून मी त्याला खुणावू लागलो. थोडक्यात जसं आपण रस्त्यावरून चालताना, एखादी गाडी येताना दिसली आणि लिफ्ट हवी म्हणून आपण त्या गाडीकडे बघून अगतिकपणे इशारा करतो, तसाच इशारा मी त्याला यावेळी त्याने त्याच्या पेट्रोल-टाकीकडे बघावं म्हणून करत होतो. त्याला माझा हा इशारा फारसा रुचलेला दिसला नाही. नापसंतीची एक छटा तेवढ्यात पण त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावरून झळकून गेली. एरवी सरकारी ऑफिसर सगळ्यांना देतात तशी 'XXX त जा' अशी नजर माझ्याकडे फेकून तो परत पुढे रस्त्याकडे बघायला लागला.
तितक्यात माझ्या लेनमध्ये समोरची गाडी स्लो झाली म्हणून मी लेन बदलून परत डाव्या लेनमध्ये या मस्टँगच्या मागे आलो. मी अचानक पाठीशी इतक्या जवळ आल्यामुळे मस्टँगवाला वैतागला असावा. जशी उजव्या लेनची स्लो झालेली गाडी मागे गेली, त्याने झटक्याने त्याची मस्टँग उजव्या लेनला मारली. कदाचित माझ्या मघाच्या इशाऱ्याचा 'स्लो चालवतोय तर मागच्या गाड्यांचा रस्ता कशाला अडवतोयस?' असा अर्थ त्याने घेतल्यासारखे देखील मला वाटले. आणि म्हणूनच तो बहुतेक इतक्या गलबलीने उजव्या लेनला गेला असावा.
इथे डाव्या लेनने मी पुन्हा त्या मस्टँगच्या बाजूला समांतर यायचा प्रयत्न सुरु केला. वयाने माझ्यापेक्षा जेमतेम चार वर्षे धाकटी असणाऱ्या माझ्या सत्त्याण्णव अश्वशक्तीच्या गाडीने मी या नव्या दोन-अडीचशे अश्वशक्तीच्या गाडीच्या बाजूला येईपर्यंत माझी गाडी कण्हू लागली होती. पण बिचाऱ्याचं अजून नुकसान नको व्हायला म्हणून माझ्या जीवाचा आटापिटा चालला होता. आता तो माझ्या उजव्या बाजूला होता रस्त्याने. मी पुन्हा हातवारे चालू केले. त्याने पुन्हा माझ्याकडे पाहिले आणि पहिल्यांदा संवाद-सदृश म्हणता येईल असा प्रश्नार्थक चेहरा करून 'आता काय?' विचारणाऱ्या आठ्या पाडल्या. मी पुन्हा आधीचा इशारा केला आणि जोरजोरात 'fuel cap, fuel cap' असा ओरडायला लागलो. एकतर दोघे हायवेवर. दोघांच्या काचा बंद. माझ्या गाडीचा आवाज एरवीदेखील प्रचंड असतो, त्यात आता तर ती जीवाच्या आकांताने रुंदत होती. त्यामुळे मला माहित होतं की त्याला घंटा काही ऐकायला जाणे शक्य नाही. पण निदान माझ्या इशाऱ्याकडे बघून आणि तोंडाच्या हालचालीवरून त्याला कळावं अशी माझी अपेक्षा होती. त्याला काही कळलं तर नाही, पण आता त्याने एकूण प्रसंगात रस घेतला.
दोघेही समोरील रस्त्याकडे लक्ष ठेऊन होतोच, पण आता त्याने मी काय सांगायचा प्रयत्न करतोय याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. मी पुन्हा पाच-सहा वेळा 'fuel cap, fuel cap' म्हणून ओरडलो, इशारे तर चालूच होते. पण तरीही त्याने त्याच्या आकलनात फारसा काही फरक पडला नाही. मग मी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला. विचार केला की एक एक अक्षर याला सांगावं. fuel असाही किती मोठा शब्द आहे? त्यावरून त्याला कळायला पाहिजे. असा विचार केला आणि त्याच्याकडे बघितलं. इशाऱ्याने त्याला सांगितलं की माझ्या ओठांकडे बघ, मी सांगायचा प्रयत्न करतोय ते कळेल. तो लक्ष देऊन बघायला लागला. मी त्याच्याकडे पाहिलं आणि उच्चार करायला सुरुवात केली - "एफ.....यु..... " बस... तितक्यातच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झटक्यात बदलले. डोळ्यांत संताप भरून आला. दातओठ खात त्याने खुन्नसने माझ्याकडे बघितलं. डाव्या हाताचं मधलं बोट वर करून मला सेकंदभर दाखवलं आणि करकचून accelerator दाबला. झूमऽऽ करून त्याची गाडी पुढे निघून गेली. पुढ्यात येणाऱ्या गाड्यांना टाळत, लेन बदलत बदलत कधी ती मस्टँग माझ्या नजरेआड झाली तेसुद्धा मला कळलं नाही. झालेला घोटाळा माझ्या लक्षात आला होता, पण तोवर बराच उशीर झाला होता. कधी नव्हे ते काहीतरी चांगलं काम करायला गेलो होतो, त्यातपण असं व्हावं याचंच आश्चर्य करत मी गाडी चालवू लागलो.
त्यानंतर पुढे गेल्यावर सुमारे अर्ध्या तासाने, त्याच रस्त्यावर मी पाहिलं की एका पोलिसाने एका गाडीला बाजूला घेतलं होतं. पोलिसाच्या गाडीची लाईट अजूनसुद्धा चालूच होती, म्हणजे नुकतंच पकडलं असणार. गाडी पाहिली तर तीच मघाची मस्टँग. माझ्यापासून पळून गेल्यापासून तो बहुदा त्याच वेगाने पुढेदेखील चालवत असावा आणि वेगमर्यादा ओलांडल्याबद्दल पोलिसाने त्याला कोपच्यात घेतला असावा. पोलिसाने त्याला त्याच्या टाकीच्या उघड्या झाकणाबद्दल सुद्धा सांगितलं असावं. कारण मी जेव्हा थोडा स्लो होऊन त्यांच्या बाजूने गेलो, तेव्हा पोलीस आपल्या गाडीत बसून त्याची पावती बनवीत होता आणि तो म्हातारा बाहेर उतरून त्याच्या टाकीचं झाकण फिरवून फिरवून लावत होता. मघाशी माझं नीट ऐकलं असतं तर ही वेळ आलीच नसती. मी पुढे माझ्या मार्गाने निघून गेलो पण इतका विचार तर मनात नक्कीच आला होता की तिथे भले थांबायला नाही, पण अजून थोडं स्लो व्हायला पाहिजे होतं आणि काच खाली करून त्या म्हाताऱ्याला तसंच मधलं बोट दाखवून ओरडायचं होतं, "एफ.....यु..... "
वैभव गायकवाड
















1 comments:
very nice...
are eeeee horse power ashwashakti???? hehhe
Post a Comment