
लगिनसराईत ऐन भरला मुंडावळ्यांचा बाजार
लावणार नेमका कोण, माथी तयार बसली हजार
झाली बोंबाबोंब, बाजारात उतरले सारे व्यापारी,
धजवेना कुणी मात्र, फोडायला आपणहून सुपारी,
बछड्याला काही काम ना धंदा, उगाच घासाघीस
गडकऱ्यांचा जीव तिकडे झाला ना कासावीस
दिल्या ना निळ्या मुंडावळ्या, कशाला हव्यात भगव्या?
कपाळमोक्ष तर होणारच, होतील कंबरा ही नागव्या
पळवाल आमचा माल, तर होईल मोठा घात
तुम्ही घाला मुंडावळ्या, घालू दुसऱ्या बछड्याला हात
हाताचा विषय निघताच, नागपुरात भरला एकदम उरूस,
कुणी देईन हाक,पण धावला कोकणचा विकासपुरुष
घड्याळाच्या काट्यांनासुद्धा हवी बाजारू चावी
मुंडावळी नाहीतर अशी कशी कुणाकडेही जावी?
बहु जनांचा भरता बाजार, वेगाने फिरली चाके,
'इतके ही काय त्याचे' म्हणणाऱ्यांनी इथेही मुरडली नाके,
विकता विकेना माल, पण किमतीचा हट्ट सोडेना,
सधन होते व्यापारीही, पण किंमत काही परवडेना
बघू पुढच्या लगिन-सराईत, आता काही जमत नाही,
तुमचा माल राहू द्या तुम्हालाच, यात आता दुमत नाही
गुंडाळला मग बाजार सरते, सोडला सगळ्यांनी नाद
गडकऱ्यांनी सोडला सुस्कारा, शेवटी महा-जनांचा आशीर्वाद.....
- वैभव गायकवाड
ता.क. वरील कविता पूर्णपणे काल्पनिक आहे, त्यातील संदर्भांचे प्रत्यक्षातील घटनांशी असणारे साधर्म्य निव्वळ योगायोग समजावे.















1 comments:
स्वत:ची किंमत कशी कमी करून घ्यावी हे मुंडे यांच्याकडून शिकावे आणि मित्र म्हणून गेम कसा करायचा हे विलास देशमुख यांच्याकडून शिकावे.
Post a Comment