
आज १४ जानेवारी, २०११. जगाच्या दृष्टीने भले काही फार मोठा दिनविशेष नाही. पण एक मराठी माणूस म्हणून आपल्या दृष्टीने आज फार मोठा आणि आठवणीत ठेवावा असा हा दिवस. आज पानिपतच्या तिसऱ्या आणि ऐतिहासिक युद्धाला अडीचशे वर्षे पुरी होत आहेत. खूपशा मराठी (म्हणविणाऱ्या) लोकांच्या हे ध्यानीमनी देखील नसते, की पानिपतचे हे युद्ध का महत्वाचे आहे.
पानिपतच्या या युद्धाचा सारांश सांगायचा झालाच, तर इतकंच सांगता येईल की जेव्हा आपण "दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा" असे गातो, त्याची पाळेमुळे या युद्धात आणि त्यामागील काही घटनांमध्ये आहे. ज्या नजीबुद्दौलाचे आमंत्रण स्वीकारून अफगाण राजा अहमदशाह अब्दालीने १७५७ साली दिल्लीवर आक्रमण केले आणि सुमारे १२ कोटी (त्यावेळचे) रुपयांची लूट गोळा केली, तोच नजीबुद्दौला दिल्ली वाचवायला (होय, वाचवायला) गेलेल्या राघोबादादांच्या तावडीत सापडला. त्याला जीवनदान देण्याची चूक मराठ्यांना भारी पडली. त्या घटनेने आणि मराठ्यांच्या वाढत्या साम्राज्याला आळा घालण्यासाठी अब्दालीने १७५९-६० मध्ये परत उत्तर भारतावर आक्रमण केले. यावेळी त्याला थांबविण्यास गेलेल्या विश्वासराव (तत्कालीन मराठी सरसेनापती) आणि सदाशिवराव भाऊ ( तत्कालीन पेशवे पंतप्रधान नानासाहेब यांचे बंधू) यांची पानिपतात अब्दालीशी गाठ पडली. १४ जानेवारी १७६१ रोजी ब्राह्ममुहूर्तावर युद्धास तोंड फुटले. माध्यान्हीपर्यंत अब्दालीच्या सैन्याला वरचढ ठरलेले मराठी सैन्य विश्वासरावांच्या मृत्यूने पार ढासळले आणि दिवसाखेर अब्दालीच्या सैन्याने पूर्ण सव्वा लाख मराठी सैन्य कापून काढले. अशाप्रकारे पानिपतचे अपयश महाराष्ट्राच्या पदरी पडले. (याबद्दल सविस्तर लेखाची लिंक खाली जोडलेली आहे.)

पानिपतचा इतिहास माहित असो व नसो, अशाही काही गोष्टी आहेत ज्या सहसा लोकांना माहित नसतात पण त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध पानिपतच्या युद्धाशी असतो. अपयशाचा सल मराठी मनातून निघावा, म्हणून काही रंजक पण सत्य बाबी इथे स्पष्ट करणे महत्वाचे वाटते.
१. अहमदशाह अब्दाली हा राजा होता, त्याच्या गाठीशी अनुभव होता. पानिपतच्या लढ्यापूर्वी सदाशिवराव भाऊ फक्त उदगीरच्या लढाईत उतरले होते, विश्वासराव तर नवखेच. अब्दालीचे सैन्यदेखील मराठी सैन्यापेक्षा किंचित जास्तच होते. तरीही प्रत्यक्ष युद्धात मराठ्यांच्या दीडपट अफगाण सैन्य गारद झाले.
२. मराठा सैन्याची रसद कापली गेल्याने संपूर्ण सैन्य निदान आठ दिवस अन्न-पाण्यावाचून होते. उलट अब्दालीचे सैन्य ताज्या दमाचे होते.
३. युद्ध जिंकल्यानंतरही अब्दालीने मराठ्यांचा धसका घेतला. युद्धानंतर अब्दालीने नानासाहेब पेशव्यांना पाठविलेल्या पत्रात विश्वासराव आणि सदाशिवभाऊ यांच्या मृत्यूबद्दल क्षमा मागून, "उत्तर भारतावर परत कधीही आक्रमण करणार नाही" याचे आश्वासन दिले आणि ते शेवटपर्यंत पाळलेही.
४. १७५२ साली तत्कालीन बादशाह आणि मराठे यांच्यात झालेल्या 'अहमदिया करारा'नुसार मराठे हिंदुस्तानचा अभिमान वाचविण्यासाठी गेले होते, निव्वळ ९ वर्षे जुना करार.
५. पिढ्यानपिढ्या बादशहाचे मांडलिकत्व स्वीकारलेल्या राजपुतान्यातून एकही मदत आली नाही, उलट त्यांनी अब्दालीचे मांडलिकत्व स्वीकारून मराठ्यांची कोंडी करायचा प्रयत्न केला. आज राजपूत म्हणून मिरविणारे कायम कुणाचे ना कुणाचे मांडलिक राहिले, आणि म्हणूनच त्यांची अफाट संपत्ती आजही आहे. उलट देशासाठी आणि धर्मासाठी कुठलाही समझोता करण्यास तयार न झालेले मराठे कायम युद्धास तयार राहिले, आणि आज पुण्यात पेशव्यांचे नामोनिशानही नाही.
६. संक्रांत आजही मराठी घरांत शुभदिन म्हणून साजरा होत नाही. विचार करा, का आपण बोलतो की तिळगुळ घ्या, आणि 'गोड गोड' बोला.
७. विश्वास पानिपतात गेला, संक्रांत कोसळली, पानिपत झाले हे सगळे वाक्प्रचार/म्हणी याच प्रसंगाशी निगडीत आहेत.
८. पानिपतात एक अख्खी मराठी पिढी कापली गेली, त्याचा परिणाम ब्रिटीशांच्या सामर्थ्यवाढीत झाला.
९. पुढची पिढी तयार होताच, मराठ्यांनी प्रथम दिल्ली काबीज केली, आणि सुमारे २५ वर्षे माधवराव पेशवे आणि महादजी शिंदे यांच्या अंमलाखाली "दिल्लीचे तख्त राखिले".
१०. मराठे आणि अफगाण ही दोन्ही त्यावेळी जगातील सर्वात मोठी साम्राज्ये होती. त्यांच्या परस्पर धड्कीने संपूर्ण भारतीय उपखंडाचे प्रचंड नुकसान झाले. याचे उदाहरण आजही वायव्येला दिसते आहे.
११. जर मराठे जिंकले असते, तर देशात ब्रिटीश राज्य येणे अशक्य होते. पुढच्या शक्यता तर अमर्याद आहेत.
सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्वाचं. आजही मराठी माणूस जोखीम घ्यायला घाबरतो. एक भय पिढ्यानपिढ्या आपल्या रक्तात भिनलेले आहे. स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल कायमची शंका आपल्या मनात बसलेली आहे. त्यातून बाहेर निघणे अजूनतरी सर्वसामान्य मराठी माणसाला जमलेले नाही. म्हणूनच हा वरचा सगळा आटापिटा.
मराठ्यांचे लक्ष्य होते, करारानुसार दिल्लीचे रक्षण करायचे, आणि मराठ्यांनी ते साध्य केलं, भले मग त्यासाठी प्राणांची आहुती द्यावी लागली. आपण जिंकलो नाही, पण अब्दाली हरला आणि त्याने मागे पाय घेतला. यातच मराठ्यांचे कार्य सिद्धीस गेले. अपयशावर रडण्यापेक्षा, स्वतःवर शंका घेण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, त्यानेच पानिपतातील हुतात्म्यांना श्रद्धांजली मिळणार आहे.
जय महाराष्ट्र
- वैभव गायकवाड
इच्छुकांसाठी : लोकसत्तातील लेख | विश्वास पाटील यांचा लेख | विकीपेडिया















5 comments:
लेख छान आहे. मराठी मनातील स्फुलिंग विझले आहे. त्याला चेतना मिळाली तरी खूप होईल.
मस्त..मराठी माणूस स्वत:च्या बायकोला सोडले तर कुणाच्या बापाला भीत नाही असा मला एकदा मेसेज आला होता. :D
me panipat kadambari wachtoy pan ya lekhamule dolyat ashru taralale
धन्यवाद मित्रा! याहून मोठी पावती काय हवी?
Dadus, jaam bahri. angavar kate ubhe rahile lekh vachun vachun. sab likn padhke ho gaya.
Post a Comment