Vaibhav Gaikwad's Blog

Thursday, October 28, 2010

अबब!!



अबब, गजब जाहले, वारी चांगलीच शेकली,
वारकऱ्याने वीटच चक्क विठ्ठलावर फेकली,

चोरीची जर शैली, चोरीचेच नाही का विचार?
वारकऱ्याच्या दिशाहिनतेला विठ्ठलच जबाबदार

दावितो साऱ्या जगा, विठ्ठलाचे पाय मातीचे,
एका निर्णयाची काशी, धिंडवडे पुरते कीर्तीचे,

गडबड उडाली बडव्यांची, झाली दाणादाण,
संभ्रमात जनता सारी, कुणाचे होतेय 'कल्याण',

चार भिंतीतला 'छत्रपती', कलंक नेमका कुणाला,
घरगुती भांडण चिरकुट, वेठीस धरती अखिल जनाला,

वरवंट्यांची सेना यांची, तरी टमरेलांची धास्ती?
एकमेकांना करी नागवे उणीदुणी काढायची मस्ती,

एक मात्र खरे, सारे एका माळेचे मणी,
काय vision आहे यांची, विचारलेय का कधी कुणी?

यांव करू नि त्यांव करू, एकदा सत्ता आल्यावर,
बोलायला त्यांचं काय जातंय, चार लोकांत आल्यावर,

विठ्ठलाला हेच दिवस होते आता बघायचे राहिले....
आपण तरी करमणुकीशिवाय काय त्यांत अजून पाहिले?


- वैभव गायकवाड

Bookmark and Share

Sunday, October 17, 2010

|| शतक ||


आज खूप साऱ्या गोष्टींचा मेळ जमून आलेला आहे, मित्रांनो! आज दसरा, आजच आपल्या ब्लॉगचे शंभर पोस्ट पूर्ण होत आहेत, त्यात देखील योगायोगाची बाब म्हणजे, आजच आपल्या ब्लॉगचे तब्बल १०,००० views झालेले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्याकडून मिळणारे प्रोत्साहन आज आपल्याला इथपर्यंत घेऊन आले, त्याबद्दल तुम्हा सर्व मित्रांचे मनापासून आभार. सहज म्हणून चालू केलेल्या उपक्रमाला निव्वळ फावल्या वेळेतला timepass म्हणून न समजता, तुम्ही प्रत्यक्ष सहकार्य देऊन आपल्या प्रतिक्रिया हि देत राहिलात, याबद्दल खरंच आनंद वाटतो. सध्या कॉलेज आणि अभ्यासात प्रचंड वेळ जात असल्याने वेळोवेळी update करायला न मिळाल्याची खंत वाटते, इतकं अगदी व्यसन लागलं आहे जणू या ब्लॉगिंगचं.

Wednesday, October 6, 2010

कविता लिहिणं तसं सोपंच असतं



कवितेत काय कठीण करायचं असतं?
ट ला ट, आणि प ला प तर जोडायचं असतं.
भावनेला गद्य-पद्याचं थोडीच सोयरसुतक असतं?
Message पोचवायचं काम तर शब्दांचंच असतं
म्हणून तर, कविता लिहिणं तसं सोपंच असतं.

विषयांच्या पुरवठ्याला जगात काय कपात आहे?
शब्दांच्या पर्यायांना 'मायमराठी झिंदाबाद' आहे,
नशिबाने यमकांची देखील इथे पुष्कळ आबाद आहे,
मांडणी pre-planned असली कि मग सगळं तयारच असतं,
म्हणून तर, कविता लिहिणं तसं सोपंच असतं.

शब्द-शब्द जोडत मग कविता होत जातात,
शब्दाचे खेळ करत स्वतःच form होत जातात,
त्यामागचे विचार सूर्यप्रकाशाइतके लख्ख होत जातात,
वाचणारे देखील शहाणे मिळाले, कि बाकी सगळं बरंच असतं,
म्हणून तर, कविता लिहिणं तसं सोपंच असतं.

Judge करणारा भले म्हणो त्याला विषयाची कुतरड,
विचारांची उधळण म्हणो वा शब्दांची उतरंड ,
उपदेशाचा पाठ म्हणो वा अगदी संदेशांची धुळवड,
आपल्याला काय, आपण आपलं काम केलेलं असतं,
म्हणून तर, कविता लिहिणं तसं सोपंच असतं.

- वैभव गायकवाड



Bookmark and Share
Related Posts with Thumbnails