Vaibhav Gaikwad's Blog

Thursday, September 30, 2010

निकाल काहीही लागो, माझ्या बाजूने तर नक्कीच नसणार.


कोण म्हणतो राम मंदिर, कोण म्हणतो मशीद
कुणी पाहिलंय काय दडलंय भूतकाळाच्या कुशीत?
मशीद बनवा वा मंदिर, माझ्यासारख्याचं तिथे काय असणार?
निकाल काहीही लागो, माझ्या बाजूने तर नक्कीच नसणार.

महासत्ता व्हायचं बोलत चाललो आपण मध्ययुगात,
डोळे उघडा, बघा जरा काय चाललंय बाकी जगात,
धर्माचं राजकारण फक्त प्रगतीला काळं पुसणार
निकाल काहीही लागो, माझ्या बाजूने तर नक्कीच नसणार.

शांतीप्रिय देशात आता करावी लागतात शांततेची आवाहने,
त्याच्याही पुढे मित्रांनो बाकी आहेत आव्हाने,
४०० वर्षे तर झालीच, अजून किती वर्षे तेच करत बसणार?
निकाल काहीही लागो, माझ्या बाजूने तर नक्कीच नसणार.

अजूनपण वेळ आहे, काय ठेवलंय वादात?
राम असो वा अल्ला, असतो शुद्ध मनाच्या शोधात.
असल्या अशुद्ध मनांमध्ये कुठला देव तरी दिसणार?
निकाल काहीही लागो, माझ्या बाजूने तर नक्कीच नसणार.

निकाल काहीही लागो, माझ्या बाजूने तर नक्कीच नसणार.

- वैभव गायकवाड
 

Bookmark and Share

Friday, September 24, 2010

लोक्शाई



कमलाबाई करते राडा, नि हाताला घड्याळाची पकर...
धनुशाच्या डोक्याला, नव्या इंजिनाची घरघर....

कोंचा कुठला बाबर,नावानं त्याच्या बोंबला...
नि कसला हिंदू, कसला मुस्लीम, सगला यरझवा मामला....

मंदिर तिकरंच भांदू म्हणत, गावभर फिरनार ठोकत...
नंतर म्हनायचं, मानूसच हाय.. कनाचं न्हाय चुकत?

बाप नि चुलता, नातं कंचं म्होटं?
दुसऱ्यांची ती घरानेशाई, आपला तो लोक-हट्ट

किरकेट मात्र बाला, शेतीपेक्षा जबरा,
पावसाआदीच कापनीच्या, लागतात तिकरं खबरा...

रांडच्यांनी मानसाला मानसाचा न्हाय सोरला..
आपल्याच पैशाच्या ढिगाराखाली देश गांधीचा पुरला...

अशी आपली लोक्शाई, समजती क रं बाला?
देश गेला खड्ड्यात गऱ्या, आपण भलं, आपला 'खंबा' भला!!

- वैभव गायकवार

Bookmark and Share

Monday, September 20, 2010

Red Alert - नक्षलवादाचा रंग

इतिहास नेहमी जेते लिहितात, त्यामुळे तो बराचसा एकांगी असतो, असं म्हणतात. मोठमोठे लोक काय इतिहास घडवतात, यापेक्षा लिहिणारे त्याचं documentation कसं करतात हे खूप महत्वाचं मानलं जातं. Improper documentation आणि/किंवा वस्तुस्थितीचा विपर्यास आणि त्याचा नंतर स्वार्थी वृत्तीने लावलेला अर्थ यांच्यामुळे इतिहासाचं होणारं नुकसान भविष्यात भारी पडू शकतं. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे सध्या बोकाळलेला नक्षलवाद.

१७७४ साली नागपूरकर भोसले आणि ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य एकत्रितपणे आता छत्तीसगडच्या बस्तरमध्ये असलेल्या दांतेवाडा परिसरात आदिवासींची लूट करण्यास शिरले आणि वादाची पहिली ठिणगी पडली. चालुक्यांचे शेवटचे वंशज त्या भागात राज्य करत होते, स्थानिक हलबा टोळ्यांनी या राजांना साथ दिली, आणि ब्रिटीश/मराठ्यांच्या सैन्याला सामोरे गेले. जेमतेम तीर-कमठा, आणि बाकी शेतातली अवजारे काय शिस्तबद्ध सैन्याच्या पुर्णनियोजित हल्ल्याला तोंड देणार? ब्रिटीश/मराठे जिंकले, चालुक्यांचा वंशनाश झाला, पण बस्तरच्या दुर्दैवाचे फेरे तितक्यात संपणार नव्हते, ते कधी संपलेच नाहीत. या एका घटनेने बस्तरचा इतिहासच नव्हे, तर भूगोलही कायमचा बदलून टाकला.

Saturday, September 11, 2010

!!!गणपती बाप्पा मोरया!!!


परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
"दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला

"उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला"
मी म्हटले "सोडून दे, आराम करू दे त्याला"

"तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस?
मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस?"

Related Posts with Thumbnails