Vaibhav Gaikwad's Blog

Sunday, January 27, 2013

माझी काय चूक?







सहसा मला टीव्ही बघायला, त्यात पण सिनेमे बघत बसायला वेळ नसतो. पण हौस भारी. त्यावर उपाय म्हणून मी जेवायला बसलो की एखादा चित्रपट लावून बसतो. तेवढाच २०-३० मिनिटांचा चित्रपट बघून होतो. उरलेला दुसऱ्या दिवशी. अशा पद्धतीने एकच चित्रपट कधी चार तर कधी आठ दिवस सुरु असतो. असाच एकदा मी जेवत चित्रपट बघत बसलो होतो. चित्रपट शेवटच्या टप्प्यात होता, तितक्यात माझा एक मित्र घरी आला. मी चक्क शारुकचा चित्रपट बघत बसलोय म्हणून तो पण माझ्यासोबत बघायला बसला. शेवटची जेमतेम वीस-एक मिनिटे आम्ही बघितली असतील. माझं जेवण आणि चित्रपट दोन्ही संपले. मित्राने विचारलं, "चांगला आहे काय? कशावर बघत होतास?" मी सांगितलं की नेटफ्लिक्सवर आहे आणि बकवास आहे एकदम. दुसऱ्या दिवशी कामावर आलो, तितक्यात त्याच मित्राचा फोन. सुरावरून चांगलाच वैतागलेला दिसत होता. मला बोलला, "च्यायला, गंडवलास मला. काल तुझ्या सांगण्यावरून मुव्ही बघत बसलो. त्यात तो शारूक येडझवसारखा काहीतरी करत होता." आता तो नेहमीच तसा करतो, त्यामुळे मित्राचं काय बिनसलंय आणि नेमका माझ्यावर का वैतागलाय मला कळेना. मित्र पुढे बोंबलतच होता, "चांगला action movie वाटला म्हणून बघायला घेतला, तर तो शारूक फुल-टाईम नो-नो-नो वरती अडकलेला. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्याचं नो-नो आणि आय हेट येल्लो याच्यापुढे काय जाईना. मला वाटलं त्याचा पोरगा मेला म्हणून आता हातात बंदूक घेईल, लोकांना गोळ्या मारत सुटेल. पण त्याचं आहे तेच पालुपद सुरु. नंतर त्याचा accident झाला, वाटलं आता तरी तो बरा होईल, पण तो काय त्याचा नखरा सोडेना. काहीतरी होईल याची वाट बघत अख्खा पिक्चर संपला पण action काय कुठे दिसली नाही". मला कळेना हा काय बोलतोय. मी विचारलं, "नेमका कुठला पिक्चर बघत होतास तू?" "माय नेम इज खान", मित्र बोलला. मी कपाळावर हात मारून घेतला. "तरीच मला कळेना तू कुठल्या चित्रपटाचं सांगतोयस, मी तो बघितलेलाच नाही", मी म्हंटलं, "मी डॉन २ बघत होतो". मित्र मात्र काही ऐकेना. शिव्यांची लाखोली वाहूनच त्याने फोन ठेवला. आता यात माझी काय चूक? नशीब त्याच्या मायला रा-वन नाही लावला चुकून. नाहीतर माझा खूनच केला असता.

परवाची गोष्ट. रिकामाच होतो. वेळ काढायला म्हणून नवीन आणलेल्या स्केट-बोर्डावर सराव करत होतो, घरामागच्या पार्किंग लॉटमध्ये. आता आता कुठे त्यावर मला जेमतेम उभं राहता येतंय. थोडा वेळ सराव करून आत येत होतो तर माझा रूम-मेट बाहेर आला. "मला पण सांग कसं करायचं?" बोललो, "अरे सोपंच आहे. कधी चालत्या ट्रेनमध्ये चढला नाहीस काय? सेम टेक्निक". त्याच्याकडे स्केट-बोर्ड देऊन मी घरात आलो. माझ्या रूममध्ये बेडवर पडून टीव्ही बघत बसलो. जेमतेम पाच मिनिटांत तो रूममध्ये आला, आणि वसकन अंगावर खेकसला, "तू आणि तुझं भिकारचोट टेक्निक. ढुंगण शेकून निघालं माझं. काय तर म्हणे चालत्या ट्रेनमध्ये चढण्यासारखंच आहे". मी म्हंटलं, "अरे, तसंच आहे. फरक इतकाच आहे की इथे तुला धरायला खांब नाहीये दारातला". असला वैतागला माझ्यावर. "भडव्या, बिना-खांब धरता तुझा बाप तरी चढलेला काय चालत्या ट्रेनमध्ये?" मी चुपचाप तोंडावर चादर घेऊन झोपलो. माझी काय चूक?

वैभव गायकवाड


Bookmark and Share
Related Posts with Thumbnails