
गेल्या गुरुवारी मी कामावरून येताना गाडीची टाकी पार रिकामी झाली होती. घरी पोहोचतोय की नाही हा doubt. कसा-बसा घरापर्यंत आलो. मी ज्या कॉलनीत राहतो, त्याच्या अगदी दारातच एक पेट्रोलपंप (गॅस-स्टेशन) आहे. पेट्रोल भरायचे लक्षात नाही, तसाच घरी गेलो. नंतर मित्रासोबत बाहेर चाललो होतो तेव्हा पहिला पेट्रोलपंपाला थांबलो. कार्ड स्वाईप केलं. आणि पेट्रोल भरायला सुरुवात केली. इथे पेट्रोल भारतापेक्षा स्वस्त आहे. इथे जसं पेट्रोलला गॅस म्हणतात, तसंच मापायला सुद्धा लिटरच्या ऐवजी गॅलन हे एकक वापरतात. एका गॅलनला $3.39 असा रेट होता. माझ्या गाडीची टाकी आहे 10 गॅलन. माझ्या अंदाजानुसार काटा कितीही खाली गेला तरी अंदाजे पाव गॅलन पेट्रोल तरी तळाला असायला हवे. म्हणजे जेमतेम पावणे दहा गॅलन पेट्रोल बसायला हवे. पंपाचा काटा मात्र चक्क 10.79 वर जाऊन थांबला आणि मग कट-ऑफ झाला. माझ्या लेखी जे जेमतेम $30-32 मध्ये उरकायला हवे, त्यासाठी चक्क $37 गेले. तेव्हा गडबडीत होतो म्हणून लगेच गाडीत बसलो आणि निघालो. काल घरी जाताना पेट्रोल परत सगळं संपलं होतं. परत त्याच पेट्रोलपंपावर थांबलो. विचार होता - आज पण तसंच झालं तर राडाच करायचा. रविवार सकाळ असल्याने गर्दी तुरळक होती. मागच्या वेळेचा पंप मात्र नेमका यावेळी बिझी होता म्हणून दुसऱ्या पंपावर कार्ड स्वाईप केलं. पेट्रोल भरलं. पंप व्यवस्थित 9.79 भरून झाल्यावर बंद झाला. चार दिवसांत पेट्रोलची किंमत पण वाढून $3.53 झालेली होती. $35.18 झाले. मग मी आत गेलो.














