आज एका मित्राशी chatting करताना सी. के. नायडूंचा विषय निघाला. निमित्त होते भारतातील खेळाडूंना जर आता भारतरत्न मिळणार आहे, तर मरणोत्तर भारतरत्न कुणाला द्यावे? मी अर्थातच नायडूंचे नाव घेतले. मुळात माझ्या इतर मित्रांप्रमाणे क्रिकेट हा काही माझा धर्म नाही - मी बॉलीवुडवाला माणूस. शिवाय मी मुंबईचा. मुंबईत क्रिकेट हा खेळण्याचा अथवा पाहण्याचा नसून चर्चा करण्याचा विषय आहे. त्यामुळे माझ्या मित्राच्या मते, मला नायडूंबद्दल फारशी माहिती नसावी. इथे उल्लेखाची बाब अशी की आधी सांगितल्याप्रमाणे, मुंबईतील अशा अनेक चर्चांमध्ये मी नायडूंचे नाव लहानपणापासून ऐकेलेले आहे, त्यांच्याबद्दल वाचलेले आहे. आपल्याकडे मुळातच इतिहासाबद्दल अनास्था. त्यात क्रिकेटच्या इतिहासाबद्दल जितकं बाहेरच्यांनी लिहिलं आहे - तितक्यातच आपण खुश असतो. आपली देशातील आपल्या माणसांबद्दल बाहेरच्यांची मते वाचून अंदाज लावणे तितकेसे सोपे नसते. पण सुदैवाने सुमारे दोन वर्षांपूर्वी नायडूंच्या कन्येचे 'सी. के. नायडू : अ डॉटर रीमेम्बर्स' हे पुस्तक वाचनात आले, आणि त्यातून कधीही न वाचलेले, न ऐकलेले वा न उमजलेले नायडूंचे चित्रण लक्षात आले.
नायडू तेलुगु घराण्यातले, पण जन्म महाराष्ट्रातला. १८ ऑक्टोबर १८९५ साली नागपुरात जन्मलेल्या नायडूंचे बालपण नागपुरातच गेले. त्यांचे क्रिकेटची सुरुवातही नागपुरातच झाली आणि त्यांच्या हिस्लोप कॉलेजिएट हाय स्कूलच्या संघाचे ते कर्णधार देखील होते. १९१६ साली मुंबईत आलेल्या नायडूंचे मुंबई तिरंगी मालिकेत 'हिंदू विरुद्ध युरोपिअन' सामन्यातून प्रथम वर्गाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण झाले. पदार्पणाच्या सामन्यात ७९/७ ला संघ पार ढासळलेला असताना नवव्या क्रमांकावर उतरून नायडूंनी विजयी खेळी केली. त्यांच्या या सामन्यातील धावांबद्दल खात्रीशीर माहिती नाही - कुणी ४० सांगतं तर कुणी ९०, पण इथून नायडूंच्या क्रिकेट कारकिर्दीला दिमाखदार सुरुवात झाली. त्यांच्या क्रिकेटमधील कौशल्य पाहून तत्कालीन इंदौर संस्थानच्या होळकरांनी नायडूंना इंदौरकडून खेळण्याचे आमंत्रण दिले, शिवाय त्यांना सेनेत भू-वायू दलाचे कप्तान बनण्याचा मान दिला.
रणजीमध्ये इंदौरकडून खेळताना नायडूंचा खेळ बहरत गेला. १९२६-२७ च्या सीझनमध्ये, मुंबई दौऱ्यावर आलेल्या एमसीसी संघासोबत खेळताना नायडूंनी ११६ मिनिटांत १६ षटकार खेचून १५३ धावा काढल्या. या खेळीचे प्रतिक म्हणून एमसीसी संघाने नायडूंना चांदीची बॅट इनाम दिली होती. तशातच १७९२ सालापासून इंग्रजांनी भारतात क्रिकेटसाठी स्थापन केलेल्या कलकत्ता क्रिकेट क्लबची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी मुंबईत १९२८ साली बोर्ड ऑफ कंट्रोल ऑफ क्रिकेट इन इंडिया म्हणजे बीसीसीआयची स्थापना झाली. पहिल्यांदा देशात आंतर-राष्ट्रीय पातळीवर क्रिकेट खेळण्यासाठी संघबांधणी सुरु झाली. होळकरांनी सुचवल्याप्रमाणे नायडूंना संघात निवडले गेले आणि योगायोग म्हणजे त्याच दिवशी भारतीय संघाला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला. ही घटना नायडूंच्या आंतर-राष्ट्रीय ख्यातीची दंतकथा म्हणून सांगितली जाते.
भारतीय संघ १९३२ साली इंग्लंडला गेला. आज ज्या वयात क्रिकेटपटू निवृत्तीच्या घोषणा करतात, त्या वयात (३७व्या वर्षी) नायडू पहिला कसोटी क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय सामना नुसते खेळलेच नाही, तर तो संपूर्ण दौरा त्यांनी अक्षरशः गाजवला. एकूण ३६ सामन्यांत ४०.४५ च्या सरासरीने १८४२ धावा कमावताना कर्णधार नायडूंनी तब्बल ६५ बळी देखील घेतले. पूर्ण दौऱ्यात नायडूंनी एकूण ३२ षटकार ठोकले, आणि एकाच सीझनमध्ये सर्वाधिक षटकार ठोकल्याचा विक्रम प्रस्थापित केला. विस्डेनने त्यांना १९३२ सालच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूचा बहुमान दिला. एजबॅस्टन येथील सामन्यात त्यांनी ठोकलेला षटकार मैदानच्या बाहेर असलेल्या ऱ्हीया नदीच्या पलीकडे, थेट दुसऱ्या कौंटीत (जिल्हा) जाऊन पडला. हे अंतर फलंदाज ते (षटकारासाठी आवश्यक असलेली किमान) मर्यादारेषा यापेक्षा तब्बल अडीचपट जास्त होते. उंच, कृष्णवर्णीय पण राजबिंडा चेहरा, आकर्षक व्यक्तिमत्व आणि खेळाडूला साजेशी कसदार काया यामुळे नायडूंचा एकूण प्रभाव अगदी जबरदस्त होता. नायडूंचा या संपूर्ण दौऱ्यात गोलंदाजांवरती असणारा एकूण वचक आणि मैदानात वावरण्याची आक्रमक शैली पाहून इंग्रजी वृत्तपत्रे त्यांना मैदानातला वाघ म्हणून संबोधू लागली होती.
नायडूंचा समावेश सर्वाधिक काळ क्रिकेटमध्ये सक्रिय असणाऱ्या खेळाडूंमध्ये केला जातो. नायडू तब्बल ६ दशके क्रिकेट खेळले. वयाच्या सातव्या वर्षापासून सुरु झालेला हा क्रिकेटचा ध्यास १९५७ साली, वयाच्या ६२ व्या वर्षीपर्यंत त्यांनी असाच जोपासला होता. शेवटच्या सामन्यात देखील त्यांनी इंदौरकडून रणजी खेळताना उत्तर प्रदेशविरुद्ध ५२ धावांची खेळी केली होती. त्याच्या आधीच्याच सामन्यात राजस्थानविरुद्ध ८४ धावा कमावताना त्यांनी विनू मंकडना 'सांगून' सलग दोन षटकार ठोकले होते. त्यांनी अधिकृतपणे निवृत्ती घोषित केली असतानाही, त्यानंतर १९६३ साली महाराष्ट्र मुख्यमंत्री ११ विरुद्ध महाराष्ट्र राज्यपाल ११ या धर्मादाय सामन्यात वयाच्या ६८व्या वर्षी पुनरागमन करून नायडूंनी ७८ धावा जमवल्या होत्या.
आक्रमक शैली, जोरदार फटके आणि प्रचंड आत्मविश्वास हे नायडूंच्या फलंदाजीचे मुख्य पैलू होते. त्यासोबत त्यांच्याकडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि मध्यम गोलंदाजीचेही कसब होते. पुस्तकात चंद्रा नायडू सांगतात की नाना (नायडू) मुलांना कायम नम्र राहायला शिकवत. नवनवीन गोष्टींसाठी प्रयत्न करताना कुठल्याही कामास कमी दर्जाचे समजू नये, पण जे काही करायचे असेल ते पूर्ण इमानदारीने आणि संपूर्ण क्षमतेने करावे (डॉ. नरेंद्र जाधवांचा 'बाप' आठवला ना?). भारत सरकारने नायडूंना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. आणि त्या काळात जेव्हा पुरेशी साधने उपलब्ध नव्हती, आर्थिक पाठबळ नसायचे, तुटपुंज्या उत्पन्नात घर चालवायचे असायचे - अशा काळात नायडूंचे पराक्रम गगनभेदी होते. कुणी मानो वा ना मानो, भारतरत्न जर खेळाडूंना मिळणार असेल, तर त्याची सुरुवात नायडूंपासूनच व्हायला हवी, असे माझे ठाम मत आहे.
नायडूंबद्दल एक दंतकथा ऐकिवात आहे की त्यांनी एका सामन्यात 'सांगून' ब्रेबोर्न स्टेडीयमवरून इतका दीर्घ आणि जोरदार षटकार ठोकला होता की त्या चेंडूने जाऊन थेट राजाबाई टॉवरच्या घड्याळाची काच फोडली होती. इतक्या अंतरावरून तोफेचा गोळा जरी सोडला तरी तो इतक्या उंचावरचे निशाण गाठू शकत नव्हता, आणि जरी गेला तरी १८ फुटी काच भेदण्याचे सामर्थ्य त्या गोळ्यात उरले नसते असे म्हणतात. एकदा एकाने असेही सांगितले होते की त्याचे स्मरण म्हणून आजही राजाबाईच्या घड्याळाची काच फुटलेलीच आहे, ती कधीही बदलली गेली नाही. राजाबाईला बऱ्याचदा गेलोय, पण कधी घड्याळाच्या काचेकडे लक्ष देऊन पाहिले नाही. एकतर लक्षात राहत नाही, आणि राहिले तरी मला ते पहायचे नाही. काही दंतकथा या दंतकथाच असू द्याव्यात. त्यांचे खरे-खोटे पडताळण्याची आपली लायकी नाही. माझी तर नाहीच, वाचकांपैकी देखील कुणाचीच नाही.
वैभव गायकवाड

















1 comments:
इतिहासात मलाही फार स्वारस्य नाही. पण लेख उत्तम...तू जर मला इतिहास शिकवायला असतास तर कदाचित आवडला असता विषय! ;)
Post a Comment