
बरेच दिवस झाले, अण्णा हजारे यांच्या जन-लोकपाल आंदोलनास सुरुवात होऊन. पहिल्या फेरीत अण्णांनी निर्विवाद यश मिळवले. आणि त्यांचे श्रेय निश्चितच अण्णांच्या स्वच्छ प्रतिमेला आणि प्रामाणिक ध्येयांना जाते. पण सुरुवातीपासून अण्णांची चळवळ 'टीम अण्णा' च्या इतर सदस्यांमुळे वादग्रस्त राहिलेली आहे. सुरुवातीला भूषण पिता-पुत्र, नंतर केजरीवाल आणि आता अगदी किरण बेदीसुद्धा या वादाच्या फेऱ्यांतून सुटलेले दिसत नाहीत. अण्णांच्या मागून वाङबाण चालवणाऱ्या या सरदारांमुळे आता खुद्द अण्णा आणि त्यांच्या लोकपाल बिलाच्या मागणीभोवती संशयाचे धुके दाट होत चालले आहे. अण्णांच्या पहिल्या फेरीचा आढावा आपण मागे 'अण्णामय' या सदरात घेतला आहे. त्यातील बरेच प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत, पण सर्वात मोठा प्रश्न हाच की - टीम अण्णाचे भविष्य काय असणार आहे?
भाकड ज्योतिष असो वा वैज्ञानिक प्रयोग, अर्थकारण किंवा समाजशास्त्र - भविष्याचे आडाखे हे नेहमी इतिहासाच्या अभ्यासातूनच बांधले जातात. शिवाय अण्णांचा सगळ्यात मोठा चाहता-वर्ग (अनुयायी तर नक्कीच नाही) असणाऱ्या तरुण वर्गाला '१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले' या नंतरचा इतिहास कधी माहीतच नसतो. अर्थात कॉंग्रेसच्या राज्यात तो शिकवला जाणार नाही, याची पुरेपूर काळजी देखील घेतली जाते. म्हणून 'स्वातंत्रोत्तर राजकीय घडामोडी' या लेख-मालिकेत १९७१ पासूनच्या (त्याचेही उत्तर मिळेल) महत्वपूर्ण राजकीय घडामोडींचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत आहे.
विषय मोठा आहे - बहुपैलू आहे. त्यामुळे वाचकांच्या आणि (मुख्य म्हणजे) लेखकाच्या सोयीसाठी एकूण 'चार' भागात लेखांची विभागणी करायचे योजले आहे.
१. अलाहाबाद खटला - १९७५
२. आणीबाणी - १९७५
३. जनता पक्ष - १९७७
४. अण्णा हजारे - २०११
शीर्षके वाचता, या सर्व घटनांचा अण्णा हजारेंशी आणि आपल्याशी काय संबंध आहे हे वरकरणी लक्षात न येण्यासारखे आहे. आणि म्हणूनच ह्या लेख-मालिकेचा घाट घालण्यात येत आहे. प्रत्येक लेख मुद्देसूद बनवताना जास्त दीर्घ होणार नाही याचा प्रयत्न केला जाईल. सदर विषयाबद्दल वाचकांकडे काही वेगळी माहिती असल्यास 'इथे' इ-मेल करून कळवावी, जेणेकरून लेख परिपूर्ण होण्यास मदत होईल. तरुण पिढीला आपल्या भाषेतून आपला इतिहास कळावा यासाठी होत असलेला हा खटाटोप सत्कारणी लागावा एवढीच इच्छा.
वैभव गायकवाड















0 comments:
Post a Comment