Vaibhav Gaikwad's Blog

Saturday, November 6, 2010

ओबामाचा दिवाळसण



फार फार पूर्वी, म्हणजे माझ्या जन्माच्याही आधी, जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हापासून एक देश म्हणून आपली जगाला आणि पर्यायाने अमेरिकेलाही पुरेशी ओळख अजूनही पुरेशी झालेली नाही असं मला कायम वाटतं. तीच गोष्ट, आपल्याबद्दलही म्हणता येईल, कि आपल्याला देखील अमेरिकेची, इथल्या एकूणच संस्कृतीची (आहे इकडे संस्कृती, कशीही का असेना) फारशी ओळख नाही. तसं म्हणायला, आपल्याकडे अमेरिकन सिनेमे पाहिले जातात, संगीत ऐकलं जातं. तरुणांचा एक मोठा वर्ग 'अमेरिकेला जायचं म्हणजे स्वर्गाला दोन बोटे कमी' या विचारसरणीने भरलेला आहे, त्यांनादेखील अमेरिका म्हणजे काहीतरी ग्रेट, निदान भारतात राहण्यापेक्षा तरी चांगलं असंच वाटत असतं. त्यापेक्षा जास्त ना त्यांना माहित असतं, ना जाणायची इच्छा असते. आणि आता तर चक्क अमेरिकेचा अध्यक्षच भारतभेटीवर आल्यामुळे, बऱ्याच जणांच्या अपेक्षा थेट America weds India च्या थाटात उंचावलेल्या दिसतायत.

सगळ्यात पहिले, ओबामा काही भारताच्या भल्यासाठी आलेला नाही. स्वतःला marketing मध्ये बाप मानणाऱ्या या लोकांना भारताच्या हिताशी काही देणं-घेणं नाही. त्यात ओबामाच्या पक्षाला भारताविषयी आस्था कधीच नव्हती. उलट त्याच डेमोक्रॅट पक्षाच्या जिमी कार्टर याने १९७८ साली भारतभेटीवर आल्यावर तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांना दिल्लीत भर पत्रकारसभेत अपशब्दांनी अपमानित केले होते. आणि याच जिमी कार्टरचे नाव हरियाणातील एका खेड्याला देण्यात आले आहे - 'कार्टरपुरी', काय बोलायचं?

मुळात स्वातंत्र्यापासून अमेरिकेने भारताकडून अशा खास काही अपेक्षा कधी ठेवल्या नव्हत्या, त्याचे मूळ कारण म्हणजे भारत-रशिया मैत्री. IIT च्या स्थापनेत मदत करण्यापासून हरितक्रांती पर्यंत अमेरिकेचा सहभाग निव्वळ व्यावहारिक कारणांमुळेच होता. त्यातही नंतर शीतयुद्धाच्या काळात आपण रशियाचे मित्र, तर नंतर पाकिस्तानची आपणच केलेली फाळणी यामुळे अमेरिकेची भारताकडे पाहायची दृष्टी बदलू लागली. त्यात १९७४ साली 'बुद्ध हसला', आणि अमेरिका बिथरली. शस्त्रास्त्रस्पर्धेत भारताला सक्षम न होऊ देण्याचे अमेरिकेचे प्रयत्न तेव्हापासून चालू आहेत, ते आजतागायत. १९७९-८९ च्या अफगाणिस्तान वरील रशियन आक्रमणानंतर तर अमेरिकेला आयतं कोलीत मिळालं, पाकिस्तानच्या रूपाने भारतीय उपखंडात कायमचा लष्करी तळ ठोकण्यासाठी. भारताशी स्पर्धा करायच्या नादात पाकिस्तानदेखील अमेरिकेचे तळवे चाटण्यात धन्यता मानू लागला. त्यामुळे उपखंडात वर्चस्व गाजवायचं तर पाकिस्तानसाठी भारताची वेळोवेळी नाकेबंदी करणे अमेरिकेलाही भाग पडले, जे अमेरिकेने आजपर्यंत मोठ्या आनंदाने पार पाडले.

१९९१ नंतर, म्हणजे 'मुक्त अर्थव्यवस्था' स्वीकारल्यानंतर भारत-अमेरिका आर्थिक संबंध वाढीस लागले आणि पहिले राव आणि नंतर वाजपेयी यांच्या प्रयत्नांनी अमेरिकन उद्योगांना भारताकडे आत्कृष्ट केले. १९९८ च्या दुसऱ्या अणुस्फोट चाचणीमुळे भारतावर अनेक निर्बंध पडले असले, तरी भारत एक शस्त्रसज्ज देश तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणातील बंदा मोहरा म्हणून साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेऊ लागला होता. त्याचे परिणाम नंतर झालेल्या खुद्द भारत-अमेरिकेतील अणुकरारातून स्पष्ट होतात.

आता देखील ओबामाच्या भेटीचे गुपित याच इतिहासात दडलेले आहे, फक्त आता त्यांचा डाव भारताला नव्हे, तर आर्थिक महासत्तेकडे घोडदौड करणाऱ्या चीनला शह देण्याचा आहे. खुद्द अमेरिकेत ओबामाच्या विषयी लोकमत बदलू लागले आहे. ओबामाच्या पक्षाला नुकत्याच झालेल्या काँग्रेसी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाने चांगलेच धोबीपछाड केलेले आहे. २०१२ च्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर पस्तावायचे नसेल, तर आताच कंबर कसायला हवी, हे ओबामाच्या ध्यानात येतेय. ऐन दिवाळीचे निमित्त साधून मुंबईत येणारा ओबामा आता दक्षिण आशियायी देशांच्या दौऱ्यावर निघालेला आहे, तेव्हा सगळीकडे जाऊन 'छोट्या-मोठ्या' भेटी देऊन सगळ्यांना पटविणे हे त्याच्या स्वतःच्या राजकीय भवितव्याचे रक्षण करण्यासाठी चालले आहे, ना कि भारताच्या. त्यामुळे ओबामाच्या बातम्यांपेक्षा आपण आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचा आनंद साजरा करणे हेच श्रेयस्कर.

- वैभव गायकवाड.

Bookmark and Share

0 comments:

Post a Comment

Related Posts with Thumbnails